कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांचे प्रश्न तत्परतेने सोडवण्यासाठी शासन स्तरावर स्वतंत्र बैठक घेऊन पत्रकारांच्या आरोग्याशी निगडीत सर्व प्रश्न मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने कोल्हापूर माहिती विभागात महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसार माध्यम अधिस्वीकृती समितीची दोन दिवसीय बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात आयोजित करण्यात आली आहे, या बैठकीचे उद्घाटन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. दरम्यान, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचा शुभारंभ झाला.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर – आपल्या लेखणीद्वारे भविष्याचा वेध घेण्याचे काम पत्रकार करतात. राज्यात अधिस्वीकृती पत्रिका मिळणाऱ्या पत्रकारांची संख्या अत्यंत कमी असून ही संख्या वाढायला हवी. त्याचबरोबर समाजातील वस्तुस्थिती परखडपणे पण योग्य पद्धतीने मांडून समाजाला जागृत करुन योग्य दिशा देणाऱ्या पत्रकारांची समाजाला गरज असून असे प्रगल्भ पत्रकार तयार होणे आवश्यक आहे, असे सांगून मध्य प्रदेशच्या धर्तीवर राज्यातील पत्रकारांना शासनाच्या वतीने विविध कल्याणकारी योजना, उपक्रम राबविण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर केल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निश्चित सकारात्मक निर्णय घेतील.
उपस्थिती – महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसार माध्यम अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदु जोशी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक तथा समितीचे सदस्य सचिव डॉ. गणेश मुळे, संचालक किशोर गांगुर्डे, कोल्हापूर विभागाचे माहिती उपसंचालक प्रवीण टाके तसेच राज्य समितीचे सदस्य व विभागीय समितीचे अध्यक्ष तसेच उपसंचालक उपस्थित होते.
——————————————————————————–