कोल्हापूर : प्रसारमाध्यम डेस्क
पक्षांचा आवाज आणि त्यांच्या हालचाली, वनस्पतीत होणारे बदल यांचे बारकाईने निरीक्षण आणि सखोल अभ्यास याचा उपयोग पर्यावरण जागरूकतेसाठी करणारे निसर्ग शिक्षक, प्रतिभावंत लेखक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षिशास्त्रज्ञ व वन्यजीव अभ्यासक, अवघे जीवन वनविद्येचा अभ्यास आणि लेखनासाठी समर्पित करणारे व्यासंगी संशोधक व वनाधिकारी म्हणून पद्मश्री मारुती चितमपल्ली यांची ओळख मराठी जगताला आहे. त्यांचे १८ जूनला ९३ व्या वर्षी निधन झाले यानिमित्त त्यांना शब्दरुपात आदरांजली…
सोलापूर येथे एका गिरणी कामगाराच्या कुटुंबात मारुती चितमपल्ली यांचा जन्म झाला. मारुती भुजंगराव चितमपल्ली हे त्यांचे पूर्ण नाव. चितमपल्ली यांच्या वडिलांना वाचनाचा छंद होता. शिक्षणाचे महत्त्व ते जाणून होते. आपल्या मुलांनी विणकामाचे साचे चालवू नयेत, त्यांनी शिकावे ही त्यांची इच्छा होती. चितमपल्ली यांची आई सुगंधाबाई – म्हणजे अम्मा. त्या स्वभावाने शांत आणि सहनशील होत्या. अम्माच्या पावलांना रानवाटांची माहेर ओढ होती. इसापाप्रमाणे तिच्या गाठीला कधी न संपणारा कहाण्यांचा खजिना होता. हा वारसा घरातून चितमपल्ली यांना लाभला. त्यांच्या पूर्वजांकडून झाडे लावणे, झाडांवर प्रेम करणे या गोष्टी त्यांना मिळाल्या. अम्मा, माळकरी आत्या, लिंबामामा हे त्यांचे अरण्यविद्येतले गुरू होते.
सोलापुरातील टी. एम. पोरे स्कूल व नॉर्थकोट टेक्निकल हायस्कूलमधून शालेय शिक्षण आणि दयानंद महाविद्यालयातून उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील व्यावसायिक शिक्षण त्यांनी स्टेट फॉरेस्ट कॉलेज, कोईमतूर आणि बंगळुरू, दिल्ली, कान्हा राष्ट्रीय उद्यान (मध्य प्रदेश), डेहराडून येथील वने आणि वन्यजीवविषयक संस्थांमधून घेतले. नांदेड येथील संस्कृत पाठशाळेत तसेच पुणे, पनवेल येथील संस्कृत पंडितांकडे संस्कृत भाषेचे व साहित्याचे अध्ययन केले. जर्मन व रशियन भाषांचाही त्यांनी अभ्यास केला. महाराष्ट्र शासनाच्या वनविभागात ढेबेवाडी ते मेळघाट अशी तीस वर्षे त्यांनी सेवा केली. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालक पदावर कार्यरत असताना १९९० साली ते सेवानिवृत्त झाले. कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या विकासात त्यांचे विशेष योगदान आहे.
निसर्ग चैतन्यमय आहे, सारे अरण्य म्हणजे एक प्राणमय जीव आहे, त्याला त्याचे स्वतंत्र व्यक्तित्व आहे ही निसर्गाकडे पाहण्याची स्वतंत्र आणि व्यापक दृष्टी चितमपल्ली यांच्या निसर्गलेखनाला निराळेपण मिळवून देते. चितमपल्ली यांच्या ललित साहित्याचा एक लक्षणीय विशेष असा की, अरण्यविद्येतून प्राप्त झालेली शास्त्रीय माहिती अतिशय लालित्यपूर्ण आणि रोचक स्वरूपात त्यात येते. शास्त्रीय ज्ञान आणि लालित्य यांचा सुरेख मेळ त्यांच्या साहित्यात पाहायला मिळतो. नानाविध रसभावनांनी त्यांचे लेखन अंतर्बाह्य फुललेले आहे. शास्त्रीय ज्ञानाच्या भाराने ते वाकले नाहीत. शास्त्रीय ज्ञान ललित रूप धारण करून अवतरण्याचे अप्रूप त्यांच्या ललितगद्यात पहायला मिळते. सृष्टीच्या माहीतगाराने अत्यंत रसज्ञ वृत्तीने केलेले हे लेखन आहे. त्यातून वनविद्येचे, अरण्यानुभवाचे अस्पर्श, अनोखे असे हिरवे जग मराठी साहित्यात आले. त्यांच्या ललित लेखनाने मराठी साहित्याच्या अनुभवाच्या कक्षा रुंदावल्या.
मारुती चितमपल्ली यांनी वन खात्यात ३६ वर्षे सेवा केली. त्या काळात देशभर संशोधकवृत्तीने भटकंती केली. त्यांनी एकूण ५ लाख किमी प्रवास केला. मारुती चितमपल्ली यांना १३ भाषांचे ज्ञान होते. त्याद्वारे आदिवासी व इतर जमातींशी संवाद साधत त्यांनी पर्यावरणाशी संबंधित मोठी माहिती मिळवली. त्या माहितीची नोंद केलेल्या आणि ३० वर्षे जपून ठेवलेल्या शेकडो डायऱ्या आहेत. डायरीतील नोंदीला शास्त्रीय आधार देत पक्षीकोश, प्राणीकोश आणि मत्स्यकोशाचे लेखन पूर्ण केलं.
अरण्यवाचनासह प्राणी, पक्षी, वनस्पतीची वैशिष्ट्यांसह वन्य जीवन विषद करणारी २५ पेक्षा जास्त पुस्तके चितमपल्ली यांनी लिहिली. निसर्गातील हा ठेवा समाजाला कळावा या भावनेतून सतत कार्यरत हा सकारात्मक विचाराचा ऊर्जाकोश म्हणजे विख्यात लेखक मारुती चितमपल्ली.
पुरस्कार व सन्मान
- तीन वेळा महाराष्ट्र राज्य पुरस्कार तसेच महाराष्ट्र शासनाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार
- दमाणी साहित्य पुरस्कार (१९९१)
- फाय फाउंडेशन पुरस्कार (१९९१)
- अखिल भारतीय मराठी विज्ञान परिषदेचा सन्मान (१९९६)
- महाराष्ट्र फाउंडेशनचा गौरव पुरस्कार (२००३)
- वेणू मेमन लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड (२००७)
- नागभूषण पुरस्कार (२००८), वसुंधरा सन्मान (२००९)
- भारती विद्यापीठ जीवनसाधना पुरस्कार (२०१३)
- १९८७ साली नाशिक येथे झालेले पहिले पक्षिमित्र संमेलन, २००० साली औदुंबर येथे झालेले ५७ वे विदर्भ साहित्य संमेलन, २००० साली उमरखेड येथे झालेले ५१ वे विदर्भ साहित्य संमेलन आणि २००६ साली सोलापूर येथे झालेले ७९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या सर्व संमेलनांच्या अध्यक्षपदाचा बहुमान त्यांना लाभला आहे.
———————————————————————————————-



