रत्नागिरी जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेले मार्लेश्वर हे तीर्थक्षेत्र म्हणजे निसर्ग सौंदर्य, गूढता आणि भक्तीचा अद्वितीय संगम आहे. महादेवाचे स्वयंभू मंदिर, गुहा भरलेला गाभारा, समोर कोसळणारा प्रचंड ‘धारेश्वर’ धबधबा आणि सृष्टीच्या रंगांची उधळण पाहताना प्रत्येक भाविकांचं मन हरखून जातं.
बेळगाव पासून सुमारे २०० किमी अंतरावर असलेल्या या ठिकाणी पोहोचण्यासाठी साडेचार तासांचा प्रवास अपेक्षित असतो. हा प्रवास जरी कंटाळवाणा वाटण्याची शक्यता असली तरी श्रावणातल्या हिरवळीने सजलेली डोंगररांगा, ओढे, घाटवाटा आणि घनदाट जंगलं या मार्गाला अविस्मरणीय बनवतात.
आंबा घाटाची मोहिनी
मलकापूरनंतर आंबा घाट ओलांडताना सह्याद्रीने आपलं उग्र सौंदर्य नजरेस पडतं. धुकं, गारवा, ऊन-पावसाचा खेळ आणि घाटातील गव्यांचं दर्शन या सर्व गोष्टींनी मन हरखून जातं. साखरप्याच्या पुढे मारळ मार्गे एक आडमार्ग निवडता येतो. खडी कोळवण, ओझरे, बामणोली मार्गे प्रवास सुरु असतो. वाटेतली दृश्यं एखाद्या स्वप्नसृष्टी सारखी दिसतात. हिरवीगार शेतं, खळाळणाऱ्या नद्या, ढगांनी झाकलेले डोंगर आणि स्वच्छ निळसर पाणी म्हणजे स्मरणातले अमूल्य क्षण असतात.
मार्लेश्वरच्या पायथ्याशी
मार्लेश्वर डोंगराच्या पायथ्याशी पोचल्यानंतर पाचशेहून अधिक पायऱ्या चढून मंदिरापर्यंत पोहोचायचं असतं. निसर्गाच्या सान्निध्यात ही चढाईसुद्धा आनंददायक वाटते. वाटेत माकडांचे खेळ, दुकाने, वाऱ्याचा गारवा आणि पर्वतरांगांची शिखरं हे सारं मन मोहवत राहणारं असतं.
धारेश्वर धबधब्याचे अद्भुत रूप
मंदिरापासून काही अंतरावरून कोसळणारा धारेश्वर धबधबा हे खास आकर्षण ठरते. अंदाजे २०० फूट उंचीवरून कोसळणाऱ्या या बारमाही धबधब्यात पावसाळ्यात बाराही छोटे जलप्रपात मिसळतात. निसर्गाची ही अप्रतिम कलाकृती पाहून मन थक्क होतं. पुढे हीच धारा ‘बाव नदी’ म्हणून प्रवाहित होते.
मार्लेश्वर गुहेतले आत्मिक दर्शन
अखेर दीड तासांच्या चढाईनंतर गुहेत पोहचायला होते. साडेतीन फूट उंचीचा दरवाजा ओलांडून गाभाऱ्यात प्रवेश करताना अंगावर रोमांच उभे राहतात. पांडवकालीन गुहेत दोन स्वयंभू शिवपिंडी मल्लिकार्जुन व मार्लेश्वर विराजमान आहेत. एकावेळी फक्त २५-३० भाविक आत प्रवेश करू शकतात. गुहेतील गूढ शांतता, वेळांची मंद उजळण आणि अद्भुत अनुभूती यामुळे दर्शनाची अनुभूती अवर्णनीय ठरली.
भाविकांची श्रद्धा आणि यात्रा
श्रावणात येथे मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी पाहायला मिळते. दर सोमवार, शनिवार, महाशिवरात्री, मकर संक्रांतीला येथे यात्रेचे विशेष आयोजन केले जाते. संक्रांतीच्या यात्रेत तर लाखो भाविक उपस्थित राहतात. त्यांच्यासाठी घाटात रस्ते, शेड्स आणि सुरक्षिततेची व्यवस्था स्थानिक प्रशासन व ग्रामस्थ करतात.
मार्लेश्वर हे केवळ धार्मिक तीर्थस्थान नसून, ते एक अध्यात्मिक आणि निसर्गाशी एकरूप होणारे जागृत स्थान आहे. सह्याद्रीच्या कुशीत, धबधब्यांच्या साक्षीने आणि हिरवाईच्या सान्निध्यात घेतलेले मार्लेश्वराचे दर्शन हे आयुष्यभर मनात रेंगाळणारे अनुभव आहे. एकदा तरी नक्कीच भेट द्यावी, अशी ही भूमी शिवमय, शुद्ध आणि शांत!
—————————————————————————————