कृष्णात चौगले : कोल्हापूर
इंजिनियरिंग आणि मेडिकल या क्षेत्रांना भारतात नेहमीच सर्वोच्च मान मिळाला आहे. पालकांचे स्वप्न, विद्यार्थ्यांची धडपड आणि समाजाचा दबाव यामुळे अनेकांनी ह्याच क्षेत्रात करिअर करण्याचा मार्ग स्वीकारला. पण काळ बदलला आहे. आज लाखो तरुण अशा क्षेत्रांमध्ये काम करत आहेत, जिथे कौशल्य, सर्जनशीलता आणि नवनवीन कल्पनांना अधिक महत्त्व दिले जाते.
इंजिनियरिंग किंवा मेडिकलची पदवी नसली तरी उत्तम पगार आणि स्थिर करिअर निर्माण करणे शक्य आहे. आज आपण अशा काही करिअर पर्यायांबद्दल जाणून घेऊ, जे तुमच्या भविष्याला नवीन दिशा देऊ शकतात.
डिझाईन
वेबसाइट किंवा मोबाईल अॅप फक्त कार्यक्षम असणे पुरेसे नाही; त्याचा वापर सुलभ आणि आकर्षक असावा लागतो. UX (यूजर एक्सपीरियन्स) आणि UI (यूजर इंटरफेस) डिझायनर्स यासाठी महत्त्वाची भूमिका निभावतात. टेक कंपन्या, ई-कॉमर्स आणि फिनटेक स्टार्टअप्समध्ये त्यांच्या सेवेला मोठी मागणी आहे. सुरुवातीचा पगार दरवर्षी ६ ते १० लाख रुपये असू शकतो, तर अनुभवी डिझायनर्स २० ते २५ लाख रुपये वार्षिक कमावू शकतात.
डिजिटल मार्केटिंग
ऑनलाईन व्यवसाय वाढत असताना, डिजिटल मार्केटिंग हे करिअर क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. एसइओ, सोशल मीडिया ट्रेंड, पेड जाहिराती आणि कंटेंट स्ट्रॅटेजी यांसारख्या कौशल्यांची गरज आहे. सुरुवातीला ५ ते ८ लाख रुपये वार्षिक पगार मिळतो, तर अनुभवी मार्केटर्स २० लाख रुपयांपर्यंत कमावतात.
एथिकल हैकिंग आणि सायबर सुरक्षा
ऑनलाईन व्यवहार आणि डेटा वाढल्यामुळे सायबर सुरक्षेचे महत्त्व वाढले आहे. नैतिक हॅकर्स कंपन्यांचे नेटवर्क सुरक्षित ठेवतात. सुरुवातीला ८ ते १० लाख रुपये वार्षिक पगार मिळतो, तर तज्ज्ञ हॅकर्स ३० लाख रुपयांपर्यंत कमावतात.
एनीमेशन आणि गेम डिझाईन
ओटीटी प्लॅटफॉर्म, व्हिडिओ गेम्स आणि व्हर्चुअल रियलिटीमुळे एनीमेशन आणि गेम डिझाईन क्षेत्राला मोठी संधी मिळाली आहे. सुरुवातीला ४ ते ८ लाख रुपये कमावता येतात, तर उत्तम पोर्ट फोलिओ असलेल्या व्यावसायिकांना १५ लाख रुपये किंवा त्याहून अधिक उत्पन्न मिळते.
सायकोलॉजी आणि मानसिक आरोग्य
मानसिक आरोग्याविषयी जागरूकता वाढल्याने मानसशास्त्रज्ञ आणि थेरपिस्ट यांची मागणी वाढत आहे. शाळा, कार्यालय, रुग्णालय आणि खासगी क्लिनिकमध्ये करिअरच्या संधी आहेत. सुरुवातीला ४ ते ६ लाख रुपये पगार मिळतो, तर अनुभवी थेरपिस्ट १५ ते २० लाख रुपयांपर्यंत कमावू शकतात.
यासोबत आणखी काही महत्त्वाची क्षेत्रे –
-
व्यवस्थापन : अभियांत्रिकी, वैद्यकीय, कायदा, बँकिंग, विमा आणि वित्तीय संस्थांमध्ये व्यवस्थापन क्षेत्रात भरपूर संधी आहेत.
-
कला आणि ललित कला : कला, ललित कला, संगीत आणि साहित्य यांसारख्या क्षेत्रातही करिअरच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत.
-
वाणिज्य : वाणिज्य क्षेत्रात अनेक पदवीनंतर विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत, ज्यामुळे बँक, विमा, पर्यटन यांसारख्या क्षेत्रात करिअर करता येते.
-
नागरी सेवा : नागरी सेवा क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.
-
पर्यटन : पर्यटन क्षेत्रात सुद्धा करिअर करण्याच्या अनेक संधी आहेत.
-
क्रीडा : क्रीडा क्षेत्रातही करिअर करण्याच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत.
-
उद्योजकता : ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची आवड आहे, त्यांच्यासाठी उद्योजकता हा एक चांगला पर्याय आहे.
-
भाषा आणि साहित्य : भाषांवर विशेष प्रेम असणाऱ्यांसाठीही करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, जसे की इंग्रजी भाषेतील करिअर.
करिअर निवडताना विचारात घेण्यासारख्या गोष्टी :
-
आवड आणि कौशल्ये : तुमच्या आवडीचे क्षेत्र निवडा, कारण यामुळे तुम्हाला शिकण्याची आणि प्रगती करण्याची प्रेरणा मिळते.
-
भविष्याचा वेध : भविष्यात कोणत्या क्षेत्रात जास्त रोजगार उपलब्ध होतील, याचा अंदाज घेऊन तयारी करावी.
-
नेटवर्किंग : महाविद्यालयांतील माजी विद्यार्थी नेटवर्क आणि करिअर सेवा केंद्रांच्या मदतीने व्यावसायिकांशी संपर्क साधा.
आजच्या तरुणांसाठी फक्त पारंपरिक क्षेत्रांवर अवलंबून राहण्याची गरज नाही. योग्य कौशल्य, नवनवीन विचार आणि आत्मविश्वास यांच्या आधारावर तुम्ही तुमचे करिअर घडवू शकता. तुमच्या आवडीच्या क्षेत्रात काम करून आर्थिक आणि वैयक्तिक यश मिळवणे पूर्णपणे शक्य आहे. काळ बदलला आहे, आता तुमच्या क्षमतेनुसार नवे मार्ग स्वीकारण्याची वेळ आली आहे.
———————————————————————————————-