मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असून, मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी झालेल्या चर्चेनंतर आंदोलनाला एका दिवसाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी केवळ एका दिवसाचीच परवानगी मिळालेली होती. परंतु जरांगे पाटलांनी पुन्हा अर्ज दाखल करून परवानगी वाढवून मिळावी अशी विनंती केली होती. त्यानुसार आता एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली असून काही अटी-शर्तींसह परवानगी दिली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, आज दिवसभर आंदोलनामुळे मुंबईतील काही भागात वाहतूक कोंडी झाली होती. या पार्श्वभूमीवर उद्याही परवानगी मिळेल का, याबाबत शंका व्यक्त होत असतानाच पोलिसांनी सशर्त मुदतवाढ दिली आहे. सकाळी झालेल्या भाषणात जरांगे पाटलांनी स्पष्ट केलं होतं की, “आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत मुंबई सोडणार नाही.”
आंदोलक वाशीच्या दिशेने रवाना
आज दिवसभर आझाद मैदानावर उपस्थित राहिल्यानंतर मोठ्या संख्येने आलेले आंदोलक आता वाशीच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यांची राहण्याची व्यवस्था वाशी परिसरात करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतील ईस्टर्न फ्री वे पुन्हा मोकळा झाला असून वाहतूक कोंडीची समस्या सुटली आहे.
“जरांगेंना अटक करा” – सदावर्ते
मनोज जरांगे पाटील आणि आंदोलनकर्त्यांनी उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या अटी-शर्तींचे पालन न केल्याची तक्रार वकील गुणरत्न सदावर्ते यांनी पोलिसांकडे केली आहे. त्यांनी जरांगेंच्या विरोधात गुन्हा दाखल करून तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर, नियमांचा भंग केल्यामुळे शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय जाधव, बजरंग आप्पा सोनवणे यांच्यावरही कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचे समर्थन करत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला. त्यांनी “आंदोलनावरून राजकारण करणाऱ्यांवरही जबाबदारी टाकली पाहिजे” असे वक्तव्य केले.
सरकार, न्यायालयीन नियम आणि आंदोलक यांच्यातील ही तिढा परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता असून, पुढील २४ तासांत काय निर्णय होतो याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
—————————————————————————————————-



