मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
राज्याचे कृषिमंत्री आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार माणिकराव कोकाटे सध्या मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. विधीमंडळाच्या अधिवेशनादरम्यान ऑनलाईन रमी गेम खेळल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर कोकाटेंवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे विरोधकांचा रोष आणखी वाढलेला दिसतोय.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आता डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न सुरु झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोकाटेंकडील कृषी खाते काढून त्याऐवजी त्यांच्याकडे मदत व पुनर्वसन विभाग सोपवण्यात येणार आहे. तर कृषी खात्याची जबाबदारी मकरंद पाटील यांच्याकडे देण्याची शक्यता आहे.
हा खातेबदल करून राष्ट्रवादीकडून कोकाटेंवरची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगितले जात आहे. कोकाटेंना थेट मंत्रिपदावरून हटवले जात नसले तरी त्यांच्या खात्यात बदल करून अप्रत्यक्षपणे त्यांना ‘अभय’ देण्यात आल्याचे चित्र सध्या राजकीय वर्तुळात उमटत आहे.
दरम्यान, अजित पवार गटात यामुळे नाराजीचं वातावरण निर्माण झाल्याचंही बोललं जात आहे. कोकाटे यांच्या गैरवर्तणुकीबाबत पक्षाची प्रतिमा मळवली गेली असतानाही त्यांच्यावर कारवाई न करता त्यांना दुसरं खातं देणं हा पक्षाचा डावपेच असल्याचं निरीक्षकांचं मत आहे.
पुढील काही दिवसांत खातेबदल अधिकृतरीत्या जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकाटेंच्या भवितव्याबाबत आणि राष्ट्रवादीच्या अंतर्गत राजकारणाबाबत अधिक स्पष्टता लवकरच मिळेल.
——————————————————————————