कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
महाराष्ट्रातील रत्नागिरी व सिधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा जगप्रसिद्ध आहे. त्यातही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडचा हापूस आंबा फार मोठ्या प्रमाणात निर्यात होतो. आंबा भारतात बहुतांशी राज्यात पिकतो. आंबा हे पिक मूळ भारतीय आहे. विशिष्ट स्वाद व विशिष्ट आकार आणि रंग यामुळे देवगड व रत्नागिरीच्या आंब्याला परदेशात मोठी मागणी आहे. भारतातून दरवर्षी जवळपास ७०,००० मेट्रिक टन आंब्यांची निर्यात होत असते. यामध्ये हापूसचा वाटा सर्वाधिक आहे. याशिवाय केसर, बनगनपल्ली, दशेरी, लंगडा, तोतापुरी, चौसा या आंब्याची निर्यात होते. हापूस आंबा मोठ्या प्रमाणात अमेरिकेला निर्यात होतो. याचबरोबर इंग्लंड, जपान आदी प्रगत देशातून हापूसला मागणी मोठी आहे.
भारत जवळपास ४१ देशांना आंब्यांची निर्यात करतो. ज्यामध्ये अमेरिका, जपान, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे.
आंब्याच्या जाती, कोणत्या राज्यात पिकतो व कोणत्या देशात निर्यात होतो –
केसर : गुजरात आणि महाराष्ट्रात पिकतो. मध्य-पूर्व देश, युरोप या देशात निर्यात होतो.
बनगनपल्ली : आंध्र प्रदेशात पिकतो. खाडी देश (UAE, Saudi Arabia), सिंगापूर या देशात निर्यात होतो.
दशेरी : उत्तर भारतात – उत्तर प्रदेशात पिकतो. कॅनडा, अमेरिका, यु.के. या देशात निर्यात होतो.
लंगडा, तोतापुरी, चौसा : हे आंबे भारतात अनेक राज्यात पिकतात. या आंब्यांच्या दर्जानुसार निर्यात होतात.
आंब्याच्या जाती, उत्पादनाचा भूभाग व त्यांचे वैशिष्ट्य :
हापूस (अल्फोन्सो ) : महाराष्ट्र – गोडसर, सुगंधी आणि रेशमासारखा पोत. साखर भरलेली चव आणि केशरी रंग. निर्यातीसाठी प्रसिद्ध. सर्वाधिक महाग.
केसर : गुजरात – जुनागढ आणि गिरनार – गडद केशरी गर. खूप गोड व सुगंधी. “मिठो केसर” म्हणून ओळखला जातो.
लंगडा : उत्तर प्रदेश (वाराणसी)- हिरवट रंगाचा आंबा. खूप रसाळ आणि गोड. पातळ साल आणि नाजूक गर. तुलनेने कमी सुगंध.
दशहरी : उत्तर प्रदेश – लखनऊ आणि मलिहाबाद – मध्यम आकाराचा, गोडसर, सुगंध. लांबट आणि गडद पिवळसर रंग.
बदामी : कर्नाटक- “कर्नाटकचा हापूस” म्हणून ओळख. सौम्य चव, गोडसर. केशरी रंगाचा गर.
चौसा : बिहार / उत्तर भारत- अतिशय गोड आणि रसाळ. तोंडात विरघळणारा पोत. साठवणीसाठी उपयुक्त.
रुमानी : आंध्र प्रदेश / तामिळनाडू- मध्यम गोडसर. लालसर पिवळा रंग. खूप रसाळ पण थोडा आंबटगोड.
नीलम : दक्षिण भारत- उशिरा येणारा हंगाम (जून-जुलै). गोडसर, सुवासिक. लहान आकार.
तोतापुरी : दक्षिण भारत – आंबटसर गोड. मोठा आकार, टोकदार शेपटी. प्रक्रिया उद्योगासाठी उपयुक्त (रस, आंबा पल्प)
राजापुरी : महाराष्ट्र / कर्नाटक- मोठा आकार. आंबटसर चव. लोणचं बनवण्यासाठी प्रसिद्ध.
——————————————————————————————–



