कोल्हापूर : प्रसारमाध्यम डेस्क
हॉकीतील कौशल्यपूर्ण खेळीमुळे “हॉकीचा जादुगार” हे बिरुद मेजर ध्यानचंद सिंह यांना मिळाले. ते भारताचे महान हॉकीपटू होते. ध्यानचंद यांच्या वैशिट्यपूर्ण खेळीमुळे त्यांचे नाव जागतिक क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. त्यांनी भारतासाठी तीन ऑलिम्पिक सुवर्ण पदकं मिळवली. त्यांचा जन्म दिवस २९ ऑगस्ट क्रीडा दिन म्हणून भारतात साजरा केला जातो. यानिमित्त ध्यानचंद यांच्या विषयी…
ध्यानचंद सिंह यांचा जन्म २९ ऑगस्ट १९०५ साली प्रयागराज (उत्तर प्रदेश) येथे झाला. त्यांचा जन्म दिवस देशभर क्रिडादिन म्हणून साजरा केला जातो. ते भारतीय हॉकी संघात १९२६ पासून १९४९ पर्यंत खेळले. या काळात त्यांनी भारतासाठी तीन ऑलिम्पिक सुवर्ण पदकं मिळवली. १९२८ साली ॲम्स्टर्डॅम, १९३२ साली लॉस ॲन्जेलिस व 1936 बर्लिन येथे झालेल्या ऑलिम्पिक सामन्यात पदके मिळविली.
अचूक पासिंग, जलद गती, आणि गोल करण्याची अफाट क्षमता यामुळे ते “हॉकीचा जादुगार” म्हणून ओळखले गेले. १९३६ च्या बर्लिन ऑलिम्पिकमध्ये, हिटलरने देखील त्यांच्या खेळीने प्रभावित होऊन त्यांना जर्मनीच्या सैन्यात वरिष्ठ पद देण्याची ऑफर दिली होती, पण ध्यानचंदांनी ती नम्रपणे नाकारली.
ध्यानचंद यांच्या स्मरणार्थ देशभर २९ ऑगस्ट हा दिवस “राष्ट्रीय क्रीडा दिन” म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने नागरिकांमध्ये क्रीडाप्रेम वाढविणे, फिटनेसबाबत जागरूकता निर्माण करणे आणि तरुणांना खेळांकडे वळविणे हा मुख्य उद्देश असतो. या दिवशी देशात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. कबड्डी, मॅरेथॉन, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, हॉकीसह अनेक खेळांच्या स्पर्धा घेतल्या जातात. मेजर ध्यानचंद यांनी आपल्या हॉकी कारकिर्दीत ५०० हून अधिक गोल केले होते. त्यांनी भारताला १९२८, १९३२ आणि १९३६ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदके जिंकून दिली. त्यांच्या या अपूर्व कामगिरीमुळे ते जागतिक स्तरावर ‘हॉकीचे जादूगार’ म्हणून ओळखले गेले.
ध्यानचंद यांची खेळी इतकी भारी होती की एकदा त्यांच्या हॉकी स्टिकमध्ये चुंबक आहे का, हे पाहण्यासाठी स्टिक तोडून तपासण्यात आली होती, कारण ते इतक्या सहजतेने गोल करत असत!
ध्यानचंद सिंह यांना भारतीय लष्करात नोकरी मिळाली. ते मेजर म्हणून कार्यरत होते. १९५६ साली त्यांना “पद्म भूषण” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारत सरकारने २९ ऑगस्ट (त्यांचा जन्मदिवस) “राष्ट्रीय क्रीडा दिन” म्हणून घोषित केला आहे. २०२१ पासून, भारतातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार “राजीव गांधी खेल रत्न” चे नाव बदलून “मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार” ठेवले आहे.