मुंबई : प्रसारमाध्यम न्यूज
महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा मोठी घडामोड घडली आहे. महाविकास आघाडीचे ( मविआ ) शिष्टमंडळ आज सकाळी राजभवनात दाखल झाले असून त्यांनी राज्यपालांकडे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.
ही मागणी काल विधानभवनात झालेल्या गोंधळानंतर करण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आरोप केला आहे की सत्ताधारी पक्षाकडून राज्यघटनेचे उल्लंघन होत असून, कायदा आणि सुव्यवस्थेचा पूर्ण बोजवारा उडालेला आहे.
राज्यपालांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात महाविकास आघाडीने जनसुरक्षा विधेयकावर स्वाक्षरी न करण्याचीही स्पष्ट मागणी केली आहे. या विधेयकावर विरोधकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि हा कायदा जनतेच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारा असल्याचा आरोप केला आहे.
या शिष्टमंडळात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते सहभागी होते. भेटीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते म्हणाले की, “राज्य सरकार अपयशी ठरले असून प्रशासनावर विश्वास उरलेला नाही. त्यामुळे आता राष्ट्रपती राजवट हाच एकमेव पर्याय आहे.”
राज्यपालांकडून या मागणीवर काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राजकीय वातावरण चांगलेच तापले असून पुढील काही तास महत्त्वाचे ठरणार आहेत.
————————————————————————————-