सिंधुदुर्ग : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
पर्यटन वाढीसाठी नावीन्यपूर्ण उपक्रमांमध्ये अग्रेसर असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्रातील पहिला आणि देशपातळीवर लक्ष वेधणारा काचेचा पूल उभारण्यात आला आहे. वैभववाडी तालुक्यातील प्रसिद्ध नापणे धबधब्यावर उभारण्यात आलेल्या या पुलामुळे सिंधुदुर्ग हे केवळ कोकणाचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे आकर्षण केंद्र बनत आहे.
नुकतेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या काचेच्या पुलाचे भव्य लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्यानंतर पूल सर्वसामान्य नागरिक आणि पर्यटकांसाठी खुले करण्यात आला असून, पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने पर्यटकांनी या पुलाला भेट दिली.
हा पूल ‘सिंधुरत्न’ योजनेअंतर्गत बांधण्यात आला असून, आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून याची नोंद होईल, असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी यावेळी व्यक्त केला. पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात प्रवेश करताना वैभववाडी हे प्रवेशद्वार असून, येथेच असलेला नापणे धबधबा पर्यटकांमध्ये फारच लोकप्रिय आहे. “सिंधुदुर्गात आल्यावर नापणे धबधब्याला भेट दिल्याशिवाय पुढे जाऊ नये,” असे म्हणतात.
डोंगर, धबधबा आणि काचेचा रोमांचक पूल ही त्रिसूत्री पर्यटकांसाठी वेगळीच अनुभूती घेऊन येत आहे. ड्रोनच्या सहाय्याने पुलाचे आणि धबधब्याचे विहंगम दृश्य चित्रित करण्यात आले आहे. पुलावरून डोकावताना खाली वाहणाऱ्या धबधब्याचे दृश्य पाहून अनेकांच्या अंगावर रोमांच उभे राहत आहेत.
या काचेच्या पुलामुळे पुढील काही वर्षांत कोकणातील एक प्रमुख सेल्फी पॉईंट तयार होईल, असा विश्वासही व्यक्त केला जात आहे. निसर्गप्रेमी, साहसप्रेमी आणि फोटोग्राफी प्रेमींसाठी हा पूल एक पर्वणी ठरत आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाल्यानंतर घेतलेली ही एक महत्वपूर्ण पावले असून, निसर्ग संपन्न कोकणात पर्यटनाला नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र दिसत आहे. नापणे धबधब्याचा काचेचा पूल हे कोकणातलं नवसंजीवित स्वप्न असून, येणाऱ्या काळात हे स्थळ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नकाशावर निश्चितच झळकणार आहे.
———————————————————————————————–




