कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रशासनात मोठे फेरबदल : तीनही प्रमुख पदांवर नवे अधिकारी

0
18

प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर

कोल्हापूर : जिल्ह्याच्या प्रशासनात मोठे फेरबदल करत राज्य शासनाने एकाचवेळी तीन महत्त्वाच्या पदांवरील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी या तिन्ही पदांवर नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून या बदलांमुळे प्रशासनात नव्या कार्यशैलीची अपेक्षा व्यक्त होत आहे.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी डॉ. विजय राठोड यांची कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. राठोड हे २०१४ बॅचचे आयएएस अधिकारी असून ते मूळचे बीड जिल्ह्यातील आहेत. त्यांनी गडचिरोली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, मिरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त तसेच जालना जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. सध्या ते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात सहमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. शिस्तप्रिय आणि विकासाभिमुख अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.

अमोल येडगे यांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये कोल्हापूर जिल्हाधिकारीपदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यांच्या कार्यकाळात महापूर नियंत्रण, मतदानाचा टक्का वाढवणे, पर्यटन आणि पायाभूत सुविधा विकास यावर विशेष भर देण्यात आला. अंबाबाई तीर्थक्षेत्र व जोतिबा देवस्थान विकास आराखड्यांना गती देण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरले.

कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तपदीही बदल करण्यात आला असून के. मंजुलक्ष्मी यांची पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी डॉ. राजेंद्र भारुड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. भारुड हे नंदुरबार जिल्ह्यातील साध्या कुटुंबातून पुढे येत आयएएस झालेले अधिकारी असून त्यांनी नंदुरबार जिल्हाधिकारी, सोलापूर जिल्हा परिषद सीईओ आणि ‘रुसा’ प्रकल्प संचालक म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या कार्यशैलीत नवकल्पना आणि जनसंपर्काला विशेष महत्त्व दिले जाते.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांची सोलापूर जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी जास्मिन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जास्मिन या २०२२ बॅचच्या आयएएस अधिकारी असून त्यांनी समाजशास्त्र विषयात पीएचडी केली आहे. रत्नागिरी येथे सहायक जिल्हाधिकारी आणि राजापूर येथे प्रांताधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

कार्तिकेयन एस. यांनी मार्च २०२४ पासून कोल्हापूर जिल्हा परिषदेत काम करताना ‘स्मार्ट शाळा’, ‘किशोरी संवाद’, ‘सुखांत योजना’, ‘मधाचे गाव’ यांसारखे उपक्रम राबवले. त्यांच्या या उपक्रमांना स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

दरम्यान, या बदल्यांची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. अखेर गुरुवारी रात्री शासनाने आदेश काढत या बदल्यांवर शिक्कामोर्तब केले. नव्या अधिकाऱ्यांच्या आगमनामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासकामांना अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here