सॅन फ्रान्सिस्को : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
अमेरिकेतील मराठी शाळांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने अधिकृत अभ्यासक्रम देण्याचे आश्वासन राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिले आहे. सध्या अमेरिका दौऱ्यावर असलेल्या शेलार यांनी कॅलिफोर्निया राज्यातील सॅन फ्रान्सिस्को येथील बे एरियामधील मराठी शाळा चालवणाऱ्या महाराष्ट्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
शेलार यांनी यावेळी सांगितले की, “ज्या पद्धतीने स्थानिक मराठी समुदाय सेवा भावाने एकत्र येऊन आपल्या मुलांना मराठी भाषा, संस्कृती, इतिहास आणि महाराष्ट्रातील लोक परंपरा शिकवत आहेत, ते अत्यंत स्तुत्य आहे. राज्य शासन या शाळांना अभ्यासक्रम देऊन अधिक बळकटी देईल.”
ही शाळा सन २००५ पासून सुरू असून सध्या सुमारे ३०० विद्यार्थी येथे मराठी शिकत आहेत. बे एरियातील ही शाळा स्थानिक मराठी मंडळाच्या पुढाकारातून आणि स्वयंसेवकांच्या समर्पित योगदानातून चालवली जाते. अमेरिकेत सध्या ५० हून अधिक अशा मराठी शाळा कार्यरत असून, त्या सर्व सेवा भावनेने स्थानिक मराठी लोकांनी स्थापन केल्या आहेत.
शेलार यांच्या या घोषणेमुळे अमेरिकेतील मराठी शाळांना शैक्षणिक दृष्टिकोनातून अधिक ठोस आधार मिळण्याची शक्यता आहे. या उपक्रमामुळे परदेशात राहणाऱ्या मराठी कुटुंबांच्या पुढील पिढ्यांमध्ये मराठी भाषेचा आणि संस्कृतीचा ठसा अधिक दृढ होईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
————————————————————————————–



