अनिल जासुद : कुरुंदवाड
शिरोळ तालुक्यातील अमृतलाट येथील ग्रामदैवत श्री कल्लेश्वर देवाची श्रावण मासात प्रत्येक सोमवारी चार धान्यात महापुजा बांधण्यात येते. गेल्या अनेक वर्षाची ही परंपरा आजतागायत येथे जपली गेली आहे. अशी महापुजा अन्यत्र कुठेही बांधली जात नाही.
अमृतलाट येथे पुरातन असे श्री कल्लेश्वर मंदिर आहे. हे मंदिर पंचक्रोशीत जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. येथे श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी श्री कल्लेश्वर देवाची महापुजा बांधली जाते. यासाठी विविध चार धान्यांचा यामध्ये वापर केला जातो.
श्री कल्लेश्वराच्या पिंडीवर ” हरी व हर ” असे दोन रुपे आहेत. या दोन रुपाच्या प्रतिमा ठेवून त्यांच्या मुकुटावर प्रत्येकी १६ किलो खपली गहू, १६ किलो हरभरा डाळ, १६ किलो उडीद डाळ, १६ किलो तांदूळ आदी धान्याचे चार थर तयार केले जातात. त्यावर लाडू ठेवला जातो. तसेच सर्व बाजूने खाऊच्या पानांची आकर्षक अशी सजावट केली जाते. पिंडी वरील ही पूजा पाहताना प्रत्येक भाविकांच्या डोळ्याचे पारणे फिटतात. इतकी सुबक, आकर्षक, अतिशय मनमोहक आरास केली जाते.
काही भाविक नवस बोलतात,तर काही भाविकांचे नवस पूर्ण झालेले असतात. असे भक्त या महापूजेसाठी सर्व धान्य देतात व त्यांच्या हस्ते पुजा केली जाते. अशा प्रकारची महापूजा इतरत्र कुठेही बांधली जात नाही. हेच या महापूजेचे वैशिष्ठ आहे. ही महापूजा बांधण्यासाठी तीन व्यक्तीना तब्बल चार तास लागतात. तिसर्या श्रावण सोमवारची महापूजा अभिजीत गुरव, मोहीत गुरव, पोपट गुरव, प्रतिक गुरव यांनी बांधली होती.
अशी महापूजा खास करुन दसरा, दिवाळी, पाडवा, गुढीपाडवा, श्रावणमास आदी मोठ्या सणादिवशीच केली जाते, असे येथील श्री कल्लेश्वर मंदिराचे पुजारी सुनिल गुरव यांनी सांगितले.
दरम्यान, श्रावण मासांनिमित्त दररोज श्री कल्लेश्वर मंदिरांत दर्शनासाठी मोठी गर्दी असते. तसेच श्रावण महिन्यात बहुतांशी भाविकांकडून कलेश्वर मंदिरात नारळांचे तोरण चढविले जाते. तसेच येथील काही भक्तांकडून प्रत्येक श्रावण सोमवारी सकाळी शाबू खिचडीचा प्रसादही वाटप केला जातो. श्रावण मासानिमित्त प्रत्येक सोमवारी सांयकाळी पालखी सोहळा असतो. यावेळी भाविक मोठ्या संख्खेने उपस्थित असतात.