कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
आज महादेव मोरे यांना आपल्यातून जाऊन एक वर्ष पूर्ण झाले. त्यांच्या जाण्याने मराठी ग्रामीण साहित्यविश्वात निर्माण झालेली पोकळी अजूनही जाणवते. मोरे यांनी आयुष्यभर ग्रामीण वास्तव, शेतकऱ्यांचे संघर्ष, गावाकडची बोलीभाषा आणि साधी-सरळ जीवनशैली यांचे अचूक आणि जिवंत चित्रण आपल्या लिखाणातून केले.
साहित्याची दिशा
मोरे यांनी कथा, कादंबरी, कविता अशा विविध माध्यमांतून लेखन केले. परंतु त्यांचे खरे बळ होते ते त्यांच्या गावी, त्यांच्या मातीत त्यांच्या जवळपास असणारी जिवंत माणसं.आणि ग्रामीण जीवनातील परंपरा या सगळ्याला त्यांनी साहित्याचा विषय बनवले. त्यामुळे त्यांचे लिखाण केवळ कागदावरचे शब्द न राहता ग्रामीण समाजाचे प्रतिबिंब ठरले.
समृद्ध साहित्यसंपदा
मोरे यांच्या लेखणीतून १४ कथासंग्रह, १८ कादंबऱ्या आणि विविध ललित गद्य साहित्य प्रकाशित झाले. त्यांनी आपल्या कथांमधून ग्रामीण जीवनातील दु:खद वास्तव सांगताना मानवी मूल्यांचा शोध घेतला.
त्यांच्या ‘चिताक’ आणि ‘चेहऱ्यामागचे चेहरे’ या कथासंग्रहांना राज्य पुरस्कार प्राप्त झाले. तर ‘झोंबड’ ही कादंबरी आशिया खंडात गाजलेल्या तंबाखू आंदोलनावर आधारित असून तिला सर्वोत्कृष्ट ग्रामीण कादंबरी म्हणून मान्यता मिळाली. तसेच ‘एकोणीसावी जात’, ‘पनोती’, ‘रैत’, ‘उड्डाळ’, ‘तिंगाड’ हे कथासंग्रह व ‘लाइन’ ही कादंबरी विशेष लोकप्रिय ठरली.
सुरुवात आणि प्रवास
महादेव मोरे यांची पहिली कथा २२ ऑक्टोबर १९५९ रोजी साप्ताहिक स्वराज्य मध्ये प्रसिद्ध झाली. त्यानंतर त्यांनी आयुष्यभर लेखन केले आणि ग्रामीण साहित्याला एक भक्कम दिशा दिली. महादेव मोरे यांच्या लेखनात खोटा दिखावा नव्हता; त्यांच्या शब्दांत मातीचा गंध आणि कष्टकरी माणसांच्या जिवंत कथा होत्या. त्यामुळेच त्यांच्या निधनाला वर्ष उलटले तरी त्यांचे शब्द अजूनही जिवंत वाटतात.
आजच्या नव्या पिढीतील लेखकांसाठी महादेव मोरे यांचा वारसा म्हणजे ग्रामीण साहित्याला दिलेली खरी दिशा. त्यांनी दाखवून दिले की गाव हा फक्त निसर्गाचा देखावा नाही, तर तो मानवी मूल्यांचा खजिना आहे. लेखनातील जिवंत शब्द अजूनही प्रत्येकाला आपलेसे करतात. मातीच्या गंधात, शेतकऱ्यांच्या घामात आणि गावकुसाच्या सावलीत अजूनही त्यांचे लेखन आपल्या जवळचे वाटते.
———————————————————————————————