प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
लुई पाश्चर (डिसेंबर २७,१८२२-सप्टेंबर २८,१८९५) हा फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ व सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ होता. तो प्रामुख्याने अनेक रोगांची कारणे व त्यांच्यापासून बचाव यामध्ये केलेल्या अमूलाग्र शोधांसाठी ओळखला जातो.
लुई पाश्चर यांच्या वैद्यकीय शोधांमुळे रोगांच्या सूक्ष्मजंतूचा सिद्धांत आणि क्लिनिकल औषधांमध्ये त्याचा वापर करण्यास थेट मदत मिळाली. बॅक्टेरियाचा संसर्ग थांबविण्यासाठी दूध आणि वाइनवर उपचार करण्याच्या तंत्राचा शोध त्यांनी सर्वसामान्य नागरिकांनसाठी लावला आहे. ही प्रक्रिया आता पाश्चरायझेशन या नावाने ओळखली जाते. लुई पाश्चर यांना बॅक्टेरियोलॉजीच्या मुख्य संस्थापकांपैकी एक म्हणून ओळखले जाते आणि ते “मायक्रोबायोलॉजीचे जनक” म्हणून प्रसिद्ध आहे
आपल्या घरात रोज येणाऱ्या दुधाच्या पिशवीवर छापलेला “Pasteurized” हा शब्द अनेकदा आपल्या नजरेत भरतो. मात्र हा शब्द केवळ तांत्रिक नसून, तो एका महान शास्त्रज्ञाच्या क्रांतिकारी संशोधनाची आठवण करून देतो – लुई पाश्चर.
नाशवंत पदार्थ, विशेषतः दूध, काही तासांत खराब होण्यामागे सूक्ष्म जंतू कारणीभूत असतात. दूध सुमारे ६० अंश सेल्सिअस तापमानापर्यंत गरम करून नंतर थंड केल्यास या जंतूंची वाढ थांबते आणि दूध बराच काळ ताजे राहते. ही प्रक्रिया प्रथम शास्त्रीय पद्धतीने सिद्ध करून प्रत्यक्ष वापरात आणणारे शास्त्रज्ञ म्हणजे लुई पाश्चर. त्यांच्या सन्मानार्थ या प्रक्रियेला ‘पाश्चरायझेशन’ असे नाव देण्यात आले.
पाश्चर यांनी आंबणे, फसफसणे आणि नासणे या जैविक क्रिया सूक्ष्म जंतूंमुळेच होतात, हा सिद्धांत मांडला. त्यांनी या प्रक्रियेसाठी ‘Fermentation’ (फरमेंटेशन) हा शब्द वापरात आणला. ज्या प्रक्रियेत उपयुक्त पदार्थ तयार होतात ती फरमेंटेशन, तर ज्या प्रक्रियेत टाकाऊ पदार्थ तयार होतात ती ‘Putrefaction’ (प्युट्रीफिकेशन) असे त्यांनी स्पष्ट केले.
१८६४ साली फ्रान्समधील वाइन उद्योग संकटात सापडला. तयार वाइन आंबट होऊन व्हिनेगरमध्ये रूपांतर होऊ लागले होते. सरकारच्या विनंतीवरून पाश्चर यांनी संशोधन करून वाइन खराब करणारे जंतू शोधून काढले. वाइन ४२ अंश सेल्सिअस तापविल्यास जंतू नष्ट होतात आणि दर्जा कायम राहतो, हा उपाय त्यांनी सुचवला. हाच उपाय पुढे दूध साठवणीसाठी वापरला गेला.
रसायनशास्त्रज्ञ म्हणून सुरुवात करून केवळ औत्सुक्यापोटी जीवशास्त्राकडे वळलेले लुई पाश्चर पुढे आधुनिक सूक्ष्मजीवशास्त्राचे जनक ठरले. आजही त्यांच्या संशोधनाचा फायदा आपल्याला रोजच्या जीवनात—दुधाच्या एका पिशवीतून मिळत आहे.
लुई पाश्चर यांचे महत्वाचे शोध
- लुई पाश्चर यांनी हवेमधील धुळीत सूक्ष्मकण असतात हे स्पष्ट केले.
- लुई पाश्चर यांनी दूध टिकवण्यासाठी निर्जंतुकीकरण या प्रक्रियेचा शोध लावला. या प्रक्रियेला त्यांच्या नावावरून पाश्चरायझेशन असे म्हणतात.
- कुत्र्याच्या चावण्याने होणाऱ्या रेबीज या रोगावरची लस शोधण्याचे काम लुई पाश्चर यांनी केले.
- अनेक महाविद्यालयात लुई पाश्चर यांनी प्राध्यापकाचे काम केले.





