कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कोल्हापूर जिल्ह्यातील अंबाबाई आणि जोतिबा ही दोन मोठी देवस्थाने आहेत. या दोन्ही देवस्थानानां संपूर्ण महाराष्ट्राबरोबर इतर राज्यातूनही मोठ्या संखेने भाविक येत असतात. आता या भाविकांसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने ड्रेस कोड लागू केला आहे. उद्यापासून भाविकानां तोकडे कपडे घालून मंदिर परिसरात येण्यास मज्जाव करण्यात येणार आहे. याबाबत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी माहिती दिली आहे.
सध्या परीक्षा संपल्या असून मुलांना सुट्ट्या लागल्या आहेत त्याच बरोबर लग्न सराई असल्याने दोन्ही मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे त्यामध्येच आता मंदिरात जाण्यासाठी ड्रेस कोड लागू केला जाणार आहे. मंदिर परिसरात येताना पारंपारिक कपडे किंवा पूर्ण अंग झाकले जाईल असेच कपडे घालून यावे लागणार आहे. तोकडे कपडे आता मंदिरात चालणार नाहीत. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना उद्यापासून ड्रेस कोडच्या नियमाचे पालक करावे लागणार आहे. तोकडे कपडे घालून मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांसाठी देवस्थान समितीकडून सोवळयाची देखील व्यवस्था केली जाणार आहे. अशी माहिती सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली आहे.
या निर्णयानंतर भविकांमधून संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. हा निर्णय घेण्यापूर्वी भाविकानां पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने पूर्व कल्पना देण्याची गरज होती, आशा काही प्रतिक्रिया जोतिबाच्या दर्शनाला आलेल्या भाविकांनी व्यक्त केल्या आहेत.
अंबाबाई आणि जोतिबा मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेस कोड लागू केला असला तरी त्याची अंमलबजावणी करण्याचे आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीपुढे पुढे आहे. हा निर्णय काटेकोरपणे राबवण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीला विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत.