Google search engine

प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर

नगरपालिका व महापालिका निवडणुकांनंतर आता राज्याचं लक्ष जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांकडे लागलं आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज अधिकृतपणे १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितींच्या निवडणुकांची घोषणा केली. मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि सचिव सुरेश काकाणी यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.

जाहीर कार्यक्रमानुसार, ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून ७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता निकाल जाहीर केला जाणार आहे. निवडणूक घोषणेसोबतच संबंधित जिल्ह्यांत आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

या निवडणुकांत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी १६ ते २१ जानेवारी दरम्यान मुदत देण्यात आली आहे.

दरम्यान, ज्या जिल्हा परिषदांमध्ये आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा अधिक आहे, त्या ठिकाणच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात घेतल्या जाणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला १५ दिवसांची मुदतवाढ दिल्यामुळे १५ फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणे आयोगावर बंधनकारक असणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अधिक वेळ देण्यात यावा, अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. त्यानुसार आयोगाने १० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ मागितली होती. या पार्श्वभूमीवर आता ग्रामीण राजकारणात जोरदार हालचालींना सुरुवात झाली आहे.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here