मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाकडून तयारीला सुरुवात झाली आहे. यासाठी आयोगाने राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना परिपत्रक पाठवून महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. निवडणूकपूर्व आढाव्यासाठी १० जुलै २०२५ रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित करण्यात आली असून, त्या बैठकीसंबंधी संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक तयारी करून उपस्थित राहावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
या निवडणुकांमध्ये राज्यातील ३२ जिल्हा परिषद, ३३६ पंचायत समित्या, २४८ नगरपरिषद, ४२ नगरपंचायती आणि २९ महानगरपालिका यांचा समावेश असून, यातील महानगरपालिका वगळता उर्वरित संस्थांच्या निवडणुकांची तयारीचा विभागनिहाय आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या परिपत्रकानुसार, जिल्हाधिकाऱ्यांनी खालील मुद्द्यांनुसार माहिती तयार करून ती आयोगाला ९ जुलै २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी PDF फॉर्मॅटमध्ये ई-मेलद्वारे सादर करावी
- निवडणुका घेण्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची माहिती
- एकूण मतदारांची संख्या
- मतदान केंद्रांची संख्या व नियोजन
- ईलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (EVM) उपलब्धता व आवश्यकता
- आवश्यक मनुष्यबळाची संख्या व नियोजन
- वेळेवर उपस्थित होणारे संभाव्य मुद्दे
तसेच, संबंधित अधिकाऱ्यांनी ही सर्व माहिती घेऊन व्हिडिओ कॉन्फरन्सच्या बैठकीस व्यक्तिशः उपस्थित राहण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. बैठकीची लिंक यथावकाश उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त राजेंद्र पाटील यांनी दिली आहे. राजकीय वातावरण निवडणुका जाहीर होण्याच्या प्रतिक्षेत असताना, प्रशासनाकडून निवडणुका शांततेत, पारदर्शक व सुचारू पद्धतीने पार पडाव्यात यासाठी ही व्यापक तयारी केली जात आहे.
हे ही वाचा…
कोल्हापूर जिल्ह्यातील आद्य पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या नंदवाळ येथील मंदिराचे महात्म्य पहा..खालील लिंकवर….
—————————————————————————————-