मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
राज्यातील तंत्रशिक्षण घेतलेल्या युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी “ मुख्यमंत्री उद्योजकता व नाविन्यता महाफंड ” अंतर्गत महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली असून, यामुळे राज्यातील तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी भक्कम आर्थिक व तांत्रिक पाठबळ मिळणार आहे.
कौशल्य विकास विभाग राज्यातील ३० लाख तंत्रशिक्षण प्राप्त विद्यार्थ्यांना ईमेलद्वारे या योजनेची माहिती पाठवणार आहे. त्यापैकी प्राथमिक निवड करून ५ लाख विद्यार्थ्यांना ५ ते १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे. विशेष बाब म्हणजे, अंतिम टप्प्यातील निवडीतून २५ हजार विद्यार्थ्यांना तब्बल २५ लाख रुपयांपर्यंत कर्ज, तांत्रिक सहाय्य आणि प्रशिक्षण देण्यात येईल. पहिल्या दोन वर्षांत कर्जफेड करण्याची आवश्यकता नाही आणि कर्जावर ५० टक्क्यांपर्यंत व्याज अनुदान राज्य सरकारकडून दिले जाणार आहे.
अशी असेल निवड प्रक्रिया
-
शासनाकडे नोंद असलेल्या ३० लाख तंत्रशिक्षण प्राप्त युवक-युवतींना ईमेल द्वारे संपर्क केला जाईल.
-
एआय आधारित प्राथमिक परीक्षा घेऊन ५ लाख विद्यार्थ्यांची निवड केली जाईल.
-
त्यानंतर मूल्यांकन चाचणी, स्पर्धा व हॅकाथॉनच्या माध्यमातून फेरचाचणी घेऊन १ लाख विद्यार्थ्यांची शॉर्टलिस्टिंग होईल.
-
अंतिम टप्प्यात २५ हजार निवडक विद्यार्थ्यांना वित्तीय सहाय्य, मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जाईल, जेणेकरून सक्षम स्टार्टअप्स आणि यशस्वी उद्योजक घडतील.
ही योजना केवळ नव्या स्टार्टअप्ससाठीच नव्हे, तर अपयशी ठरलेल्या स्टार्टअप्सना पुन्हा चालना देण्यासाठीही राबवली जाणार आहे. लाखो विद्यार्थ्यांना लाभ मिळवून देणारी ही योजना महाराष्ट्रातील युवा शक्तीचा पूर्ण उपयोग करून राज्याच्या औद्योगिक प्रगतीस नवी दिशा देणारी ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
———————————————————————————-



