साहित्यिक प्रदीप कोकरे, डॉ. सुरेश सावंत यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन..

0
101
Literary Pradeep Kokare, Dr. Congratulations to Suresh Sawant from Deputy Chief Minister Ajit Pawar.
Google search engine

मुंबई : प्रतिनिधी 

साहित्यिक प्रदीप कोकरे यांच्या ‘खोल खोल दुष्काळ डोळे’ मराठी कादंबरीस ‘साहित्य अकादमी युवा पुरस्कार’ तसेच बालसाहित्यकार, शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुरेश सावंत यांच्या ‘आभाळमाया’ काव्यसंग्रहास ‘बाल साहित्य पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. साहित्य अकादमीच्या पुरस्कारांमुळे अभिजात भाषेचा दर्जा मिळालेली मराठी भाषा साहित्यिक, सांस्कृतिकदृष्ट्या अधिक समृद्ध होण्यास मदत होईल. नवीन पिढी मराठी साहित्याकडे आकर्षित होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

साहित्य अकादमीच्या वतीने वर्ष 2025 साठीचे 24 भाषांसाठीचे ‘बाल साहित्य पुरस्कार’ आणि 23 भाषांसाठीचे ‘साहित्य अकादमी युवा पुरस्कार’ आज जाहीर करण्यात आले. पुरस्कार जाहीर झालेल्या अन्य भाषेतील साहित्यिकांचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. मुलांसाठी लिहितांना बालसाहित्यिकांना स्वत: मूल होऊन जगावं लागतं. मुलांचं मनोरंजन करतांना त्यांचं ज्ञानार्जनही होईल याकडे लक्ष द्यावं लागतं. मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होईल, यासाठी प्रयत्न करावे लागतात. प्रयोगशील शिक्षणतज्ञ असल्याने डॉ. सुधीर सावंत यांनी ही किमया लीलया साधली आहे. त्यामुळेच त्यांचं लेखन प्रभावी ठरत आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव केला.

कादंबरीकार प्रदीप कोकरे हे वास्तवदर्शी लेखक असून समाजातील गरीबी, बेरोजगारी, दुर्बल, उपेक्षित घटकांचं जीवनदर्शन त्यांच्या साहित्यात घडतं. त्यांचं लेखन हे सामाजिक प्रश्नांना थेट भिडणारं, त्यावर परखड भाष्य करणारं असतं. त्यांच्या ‘खोल खोल दुष्काळ डोळे’ कादंबरीस जाहीर झालेला ‘साहित्य अकादमी युवा पुरस्कार’ हा मराठी साहित्य क्षेत्राचाही गौरव असून तो आपल्या सर्वांना समाजाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी देणारा ठरेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कादंबरीकार प्रदीप कोकरे यांचं अभिनंदन केले आहे.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here