कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
गेल्या २४ तासांत कोकण आणि घाट भागांत हलक्या ते मध्यम पावसाची नोंद झाली आहे. काही दिवस अशी स्थिती राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मान्सूनच्या राज्यभर आगमनानंतर संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने दमदार हजेरी लावली होती. मागील दोन आठवड्यांपासून राज्यातील बहुतांश भागात संततधार सुरु होती. सध्या विशेषतः विदर्भात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला, त्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले.
कोकण आणि पश्चिम भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे.अमरावती, वर्धा, बुलढाणा, नागपूर, भंडारा, गोंदिया यांसारख्या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. आरबी समुद्रात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि आर्द्र वारे कोकण व घाटांकरिता पावसाला पोषक ठरत आहेत. हवामान विभागाने पुणे व मुंबई यांनी देखील सतर्कतेसाठी अलर्ट जारी केले आहेत.
कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात जवळपास दीड महिना हलका ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाल्याने शेतांमध्ये पाणी साचल्याने पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. स्थानिक प्रशासन, एन डीआरएफ, आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क झाले होते आणि काही भागांमध्ये नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर देखील करण्यात आले.
कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात आता पावसाचा जोर काहीसा कमी झाला असून जलपातळी हळूहळू घटत आहे. पूरग्रस्त भागात मदतकार्याला गती देण्यात आली आहे. प्रशासनाने पूरस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले असून नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
—————————————————————————————-