मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
मराठी टेलिव्हिजनवर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा लोकप्रिय विनोदी शो ‘चला हवा येऊ द्या’ पुन्हा एकदा नव्या स्वरुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या सीझनमध्ये सगळंच नवीन असणार असून, शोच्या टीम पासून ते सूत्रसंचालना पर्यंत अनेक मोठे बदल झाले आहेत.
नवा सूत्रसंचालक, नवी टीम
‘चला हवा येऊ द्या’चे निर्माते, लेखक, दिग्दर्शक आणि लोकप्रिय निवेदक डॉ. निलेश साबळे यांचा या सीझनमध्ये सहभाग नसेल, अशी अधिकृत माहिती समोर आली आहे. मुंबई टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, डॉ. निलेश साबळे यांच्या जागी अभिनेता अभिजीत खांडकेकर हा नवा सूत्रसंचालक म्हणून या शोमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अभिजीत खांडकेकरला मराठी सिनेसृष्टीत दमदार अभिनयासाठी ओळखलं जाते. पण त्याच बरोबर त्याने आतापर्यंत अनेक कथाबद्ध कार्यक्रम, पुरस्कार सोहळे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं यशस्वी सूत्रसंचालन केलं आहे. त्यामुळे ‘चला हवा येऊ द्या’ सारख्या लोकप्रिय शोमध्ये त्याची एंट्री प्रेक्षकांसाठी नक्कीच मोठं आकर्षण ठरणार आहे.
दिग्दर्शन आणि लेखन टीममध्ये मोठे बदल
या नव्या सीझनमध्ये ‘चला हवा येऊ द्या’च्या दिग्दर्शनाची धुरा अभिनेता प्रियदर्शन जाधव, अभिनेता योगेश शिरसाट आणि अमोल पाटील यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. तर लेखन टीम मध्ये प्रियदर्शन जाधव, योगेश शिरसाट, अभिषेक गावकर, रोहित कोतेकर, पुर्णानंद वांढेकर आणि अनिश गोरेगांवकर यांचा समावेश आहे.
नव्या सीझनमध्ये विनोदवीर श्रेया बुगडे, कुशल बद्रिके आणि भारत गणेशपुरे हे कायम असणार आहेत. नुकत्याच झळकलेल्या प्रोमोमध्ये या तिघांची झलक पाहायला मिळाली होती. मात्र, भाऊ कदम आणि डॉ. निलेश साबळे यांचा या प्रोमोमध्ये अनुपस्थित असल्यामुळे प्रेक्षकांच्या मनात चर्चा रंगल्या होत्या, त्या चर्चांना आता दुजोरा मिळाला आहे.
प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
‘चला हवा येऊ द्या’ हा शो गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला आहे. त्याच्या संवादातून, स्किट्समधून आणि हलक्याफुलक्या शैलीत समाजावर केलेल्या भाष्यामुळे या शो ने वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे नव्या टीमसोबत हा नवा सीझन प्रेक्षकांना किती भावतो, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
लवकरच हा नवा सीझन झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
———————————————————————————————






