कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
उन्हाचा तडाखा वाढलाय. अंगाची कायली हुतीया. नुसतं पाणीचं जातंय. अशावेळी जनावरं व शेताची पण काळजी घ्यायला लागती. मग काय आम्ही हाय त्या जमिनीत बारा महिने पिकं घेतोय. जिमिनीला उसंतच देत नाही. एकामागं एक पिक. दोन तीन वर्षे तर तेचं पिकं घ्यायचं. अशानं जमिनीची सुपीकता राहतिया व्हय.. पर याकडं कोण लक्ष देतंय. यासाठी एक दोन वर्षानंतर रान उन्हाळ्यात नांगरून तापत ठेवाय लागतंय. तेच्यानं लय फायदं होत्यात अन् पिकं बी जोमानं येत्यात. मग, बघूया काय उपयोग हाईत ते…
उन्हाळा हा हंगाम शेतासाठी फायद्याचा असतोय. खास करून नांगरून ठेवण्यासाठी उपयुक्त असा काळ. जमिनीची खोल नांगरणी करून उन्हात तापत ठेवले जाते, तेच्यामुळे अनेक नैसर्गिक व शाश्वत फायद्यांसाठी उपयोग होतो. यामुळे केवळ तण व किड नियंत्रणापुरती मर्यादित राहत नसून, जमिनीचा पोत आणि संरचना सुधारण्यास आणि पुढील हंगामाच्या योग्य तयारी करण्यासाठीही महत्त्वाची ठरते.
जमिनीची खोल नांगरणी करून जमीन तापत ठेवण्याचे फायदे :
१) रोग व किडींचा नैसर्गिकरित्या नायनाट होतो : उन्हाळ्यामध्ये खोल नांगरणी केल्याने जमिनीतील लपलेल्या किडी, अळ्या, बुरशी, आणि जिवाणूंना उन्हाची तीव्रता सहन होत नाही. उष्णतेमुळे ते नष्ट होतात, त्यामुळे पुढील येणाऱ्या हंगामामध्ये देखील पिकाचे सुरक्षित नियोजन करण्यास मदत होते, आणि एकंदरीत उत्पन्न देखील जास्त वाढण्यास मदत होते.
२) तणांचे नियंत्रण : तणांच्या बियांना देखील अंकुरण्यासाठी विशिष्ट तापमानाची गरज असते. उन्हाच्या जास्त तीव्रतेमुळे बिया पूर्णपणे नष्ट होतात, परिणामी पुढील हंगामात तणांचे प्रमाण कमी राहते. त्यामुळे मुख्य पिकात पाण्याचे आणि अन्नद्रव्यांचे नियोजन केल्यावर पूर्णपणे ते पिकालाच मिळते.
३) जमिनीची संरचना सुधारते : खोल नांगरणीमुळे जमिनीचे थर हलके, भुसभुशीत होतात. त्यामुळे मुळांची वाढ चांगली होते. हवा आणि पाण्याचा प्रवेश योग्य प्रमाणात होतो.
४) सेंद्रिय घटकांचा विघटन वेग वाढतो : तापलेल्या जमिनीत जीवाणूंची क्रिया जलद होते, ज्यामुळे सेंद्रिय पदार्थ लवकर कुजून झाडांना उपयुक्त अन्नद्रव्यांमध्ये रूपांतरित होतात.
५) जमिनीत हवा खेळती राहते : खोल नांगरणीने जमिनीत ऑक्सिजनची देवाणघेवाण वाढते, जे जमिनीतील उपयोगी सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरते. तसेच पुढे पिकाची वाढ देखील चांगली होते.
6) जमिनीत ओलावा टिकवण्यासाठी उपयुक्त : उन्हाळ्यात नांगरलेली व तापलेली जमीन पावसाळ्यात पाणी अधिक प्रमाणात शोषते, आणि ओलावा टिकवून ठेवते, जे खरीप पिकासाठी फायदेशीर ठरते. तसेच खरिफ हंगाम पिकांसाठी वापसा अवस्था पिकामध्ये बनून राहते.





