मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
राज्यातील लाखो महिलांसाठी दिलासा देणाऱ्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थिनींना दरमहा १५०० रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. मात्र, जून २०२५ महिना संपत आला असतानाही या महिन्याचा हप्ता अद्याप जमा झालेला नाही. त्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये अस्वस्थता आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जून महिना संपण्यास अवघे तीन दिवस शिल्लक असताना, महिलांच्या खात्यात रक्कम जमा न झाल्यामुळे अनेकजणी संभ्रमावस्थेत आहेत. याच दरम्यान, जून आणि जुलै महिन्याचे हप्ते एकत्र जमा होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मात्र, अद्याप सरकारकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
सरकारी यंत्रणेचे मौन आणि चर्चांना उधाण
महिलांच्या खात्यात नियमितपणे पैसे जमा होत असल्याने सरकारच्या या योजनेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मात्र, जून महिन्यात विलंब झाल्यामुळे अनेकजणी सोशल मीडियावर आणि स्थानिक प्रशासनाकडे याबाबत चौकशी करत आहेत. काहीजणांनी थेट बँकांमध्ये जाऊन खात्याची माहिती घेतली, मात्र जून महिन्याचा हप्ता जमा झाल्याचे कोणतेही अपडेट मिळाले नाही.
राज्य सरकार किंवा संबंधित विभागाकडून यावर कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण न दिल्याने संभ्रम वाढत आहे. त्यामुळे महिलांमध्ये ‘पैसे येणार की नाही ?’, ‘एकत्र हप्ते जमा होणार का ?’, ‘तांत्रिक कारणामुळे विलंब झाला आहे का ?’, असे प्रश्न निर्माण झाले आहेत.
राज्यातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकातील महिलांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. महिलांना दरमहा १५०० रुपयांची थेट आर्थिक मदत दिली जाते. यामध्ये घरखर्च, शिक्षण, आरोग्य आदी गोष्टींसाठी महिलांना थेट मदत मिळते. यामुळे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा सरकारचा उद्देश आहे.जूनचा हप्ता विलंबाने का जमा होत आहे, याबाबत सरकारने तातडीने खुलासा करावा, अशी मागणी महिला लाभार्थींकडून होत आहे. तसेच, पुढील महिन्याचे हप्ते वेळेवर मिळावेत यासाठी यंत्रणेने पावले उचलावीत, असेही महिलांचे म्हणणे आहे.
———————————————————————————————–



