मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
निवडणुका जवळ आल्याने महिला सबलीकरणाच्या नावाखाली आणलेली ‘लाडकी बहिण’ योजना सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सरकारकडून महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेवर एकीकडे बोगस लाभार्थ्यांचे आरोप होत असतानाच, मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वादग्रस्त विधानामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे.
गुलाबराव पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं, ” महिलांना रक्षाबंधनाला भाऊ पाचशे आणि भाऊबिजे लाही पाचशेच देतो, मात्र आमचं सरकार दर महिन्याला तुम्हाला १५०० रुपये देतंय ही साधी गोष्ट आहे का ? ” त्यांच्या या विधानावर विरोधकांनी आणि महिलांमध्ये संताप व्यक्त केला आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या योजनेचं इतकं फसवणुकीच्या थाटात वर्णन करणं, हे निंदनीय असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.
दरम्यान, लाडकी योजनेत झालेल्या अनियमितता आता सरकारच्या लक्षात आल्याचं दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे २६ लाख अर्जांची पडताळणी सरकारकडून करण्यात येणार आहे. चुकीची माहिती देऊन लाभ घेतले गेले असण्याची शक्यता लक्षात घेता ही कारवाई होणार आहे.
मात्र, प्रश्न असा उपस्थित होतो की निवडणुकांच्या तोंडावर इतक्या मोठ्या प्रमाणात अर्ज मंजूर झालेच कसे ? तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांनी या अर्जांचे कागदपत्र पडताळणी केली होती की नाही, यावर सरकार गप्प आहे. जर लाभार्थ्यांनी खोटी माहिती दिली असेल, तर ती माहिती मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी काय ? यावर ना मंत्री गुलाबराव पाटील, ना महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे काही बोलत आहेत
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहिण योजना हा राजकीय स्टंट होता का ? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. महिलांसाठी सुरू करण्यात आलेली योजना आता राजकीय आरोप-प्रत्यारोप, चुकीच्या मंजुरी आणि प्रशासनातील हलगर्जीपणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. संपूर्ण प्रकरणात आता शिस्तबद्ध चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सरकारची प्रतिमा आणि महिलांचा विश्वास याची कसोटी लागणार असल्याचे दिसते.
——————————————————————————————-



