The water of Krishna has damaged the Narsinghwadi Datta temple.
कुरुंदवाड : प्रतिनिधी
जिल्ह्यासह धरणपाणलोट क्षेत्रात सुरु असलेला पाऊस, विविध धरणातून करण्यात येत असलेला विसर्ग यामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णेच्या पाणी पातळीत रात्रीतून सात फुटाने वाढ झाली आहे.
गेले चार दिवस सर्वत्र पावसाची सतंतधार सुरुच आहे. यातच कोयना, वारणा, राधानगरी आदी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. यामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा – पंचगंगेच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. आज सकाळी सात वाजता राजाराम बंधार्याजवळ पाण्याने इशारा पातळी ओलांडली आहे. येथील इशारा पातळी ३९ फुट आहे. तर धोका पातळी ४३ फुट आहे. आज सकाळी ७ वाजता येथील पातळी ३९ फुट ५ इंचावर गेली आहे. नृसिंहवाडी दत्त मंदिराला कृष्णेच्या पाण्याचा पूर्ण विळखा पडला असुन आज बहुतांशी मंदिर पाण्याखाली गेले आहे.
सध्या कोयनेतून ९५,३०० क्युसेक,वारणेतून ३९,६६३ क्युसेक, दुधगंगेतून २५,१०० क्युसेक,राधानगरीतून ४३५६ क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरु आहे. तर अलमट्टीतून दोन लाख क्यूसेक विसर्ग होत आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंत राजापूर बंधार्याजवळ पाणी पातळी ४० फुट ३ इंच झाली आहे. तर नृसिंहवाडीजवळ ५० फुट ६ इंच झाली आहे. दरम्यान शिरोळ तालुक्यातील कृष्णा – पंचगंगा, दुधगंगा या नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. यामुळे नदीकाठावरील शेकडो एकर गवतकुरणे पाण्याखाली गेली आहेत.