कृष्णेच्या पातळीत सहा फुटाने घट

वारणेतून विसर्ग बंद : तर कोयनेतून आणखी वाढवला.

0
205
As the floodwaters of the Krishna River recede, the flood threat to the Narsinghwadi Datta temple is gradually decreasing. (Photo: Anil Jasud)
Google search engine
अनिल जासुद : कुरुंदवाड
शिरोळ तालुक्यातील कृष्णेच्या पातळीत सोमवारी २४ तासांत सहा फुटाने घट झाली आहे. शिरोळ तालुक्यांसह वारणा धरण पाणलोटक्षेत्रात पावसाने पूर्ण उघडीप दिली आहे. यामुळे रविवार पासून वारणा धरणाच्या वक्र दरवाज्यातून सुरु असलेला ३१९३ क्युसेक विसर्ग सोमवारी दुपारी अडीच वाजल्यापासून बंद करण्यात आला आहे. मात्र, धरणाच्या विद्युत गृहातून १६३० क्युसेक विसर्ग सुरु ठेवण्यात आला आहे. तसेच राधानगरी धरण पायथा विद्युतगृहातून १५०० क्युसेक सुरु आहे.
शिरोळ तालुक्यातील पूर ओसरत असतानाच सोमवार दुपार पासून कोयना धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. कोयना धरणात पाण्याची आवक वाढत आहे. यामुळे सोमवारी दुपारी ४ वाजल्यापासून धरणांचे सहा वक्र दरवाजे १ फुटांवरुन २ फुटांवर नेण्यात आले आहेत. यातून एकूण १८,९०० क्युसेक विसर्ग नदीपात्रात करण्यात आला आहे. यामुळे सद्य पूरस्थितीत नद्यांच्या पाणी पातळीत आणखी वाढ होऊ शकते. परिणामी नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
शिरोळ तालुक्यात पूर ओसरत असला तरी अजूनही नद्यांचे पाणी पात्राबाहेरुनच वाहत आहे. शेत शिवारात शिरलेले पाणी हळूहळू कमी होत आहे. काही गावात रस्त्यावर, पुलावर आलेले पाणी ओसरुन वाहतुकीसाठी खुले होत आहेत. तर महत्वाचे रस्ते, पुल अजूनही पाण्याखाली आहेत. अशाच वेळी कोयना धरणांतून पुन्हा विसर्ग वाढविण्यात आल्यामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णेच्या पाणी पातळीत पुन्हा अंशी वाढ होणार आहे. यामुळे पूरस्थिती जैसे थे राहु शकते. तर नदीकाठांवरील शेतशिवारात शिरलेले पाणी आणखी काही दिवस तसेच राहू शकते. यामुळे अतिपाण्यामुळे यातील विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.
दरम्यान नृसिंहवाडी जवळ रविवारी सांयकाळी पाच वाजता पाणीपातळी ५७ फुट ८ इंच होती. ती सोमवारी सांयकाळी पाच वाजेपर्यंत ५१ फुटांवर ८ इंचावर आली आहे. यानुसार पाणी पातळीत सहा फुटाने घट झाल्याचे दिसून येते. राजापूर धरणांजवळ रविवारी सांयकाळी पाणी पातळी ४६ फुट ६ इंच होती, ती सोमवारी सांयकाळी ४१ फुटांवर आली आहे.

सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयना धरणात १०१.१४ टीएमसी, वारणा धरणात ३१.९९ टीएमसी, राधानगरी धरणात ८.१९ टीएमसी, तर अलमट्टी धरणात ११५.३८३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. अलमट्टीतून १,५०,००० क्युसेकने विसर्ग कर्नाटकात करण्यात येत आहे. दरम्यान, शिरोळ तालुक्यात सोमवारी दिवसभर पावसाने पूर्ण उघडीप दिली होती.

—————————————————————————————————
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here