कुरुंदवाड : प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत एका दिवसात तब्बल ८ फुटाने वाढ झाली आहे. यामुळे नृसिंहवाडी श्री दत्त मंदिराला बुधवारी कृष्णेच्या पाण्याचा पुन्हा वेढा पडला आहे. संध्याकाळी सात वाजेपर्यंत कृष्णेचे पाणी मंदिराच्या गाभार्याजवळील कासवापर्यंत पोहचले आहे. पाण्याची पातळी याच गतीने वाढत राहील्यास उद्या गुरुवारी दूपारनतंर कधीही या मोसमातला तिसरा चढता दक्षिणद्वार सोहळा होऊ शकतो.
यापुर्वी २६ जुन व ४ जुलै असा दोनवेळा दक्षिणद्वार सोहळा झाला आहे. तर गेल्या शुक्रवारीच म्हणजे ११ जुलै रोजी नृसिंहवाडी दत्त मंदिर दर्शनासाठी खुले झाले होते. मात्र धरणपाणलोट क्षेत्रात पुन्हा वाढलेला पाऊस व कोयनासह वारणा धरणांची पाणी पातळी नियत्रिंत करण्यासाठी करण्यात येत असलेला विसर्ग यामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत चार दिवसातच पुन्हा झपाट्याने वाढ झाली आहे. बुधवारी श्री दत्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी दुपारनतंर पाण्यातूनच “श्रीं”चे दर्शन घेतले.
कोयना धरणातून मंगळवारी एकूण ५५०० क्युसेक विसर्ग करण्यात येत होता. त्यामध्ये बुधवारी दुपारनतंर ५९०० क्युसेकने पुन्हा वाढ करण्यात आली. यामुळे बुधवारपासुन कोयनेतून एकूण प्रतिसेकंद ११४०० क्युसेकने विसर्ग नदीपात्रात सुरु आहे, तर वारणेतूनही एकूण ८५३० क्युसेकने विसर्ग सुरु आहे.
नृसिंहवाडी जवळ मंगळवारी ४ वाजता पाणी पातळी ३१ फुट ६ इंच होती, ती बुधवारी सांयकाळी ४ वाजता ३९ फुट ६ इंचावर गेली आहे. यानुसार दिवसभरात सुमारे तब्बल ८ फुटाने कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
दरम्यान शिरोळ तालुक्यात बुधवारी दिवसभर पावसाने उघडीप दिली आहे. बुधवारी सांयकाळी ५ वाजेपर्यंत राजापूर धरणाजवळ पाणी पातळी २८ फुट ६ इंच झाली आहे, तर कोयना धरणात ७७.४० टीएमसी, वारणा धरणात २८.५३० टीएमसी व अलमट्टी धरणात ९८.४३६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
—————————————————————————————–




