Steps are being taken towards the soon commissioning of the new Vaibhavwadi-Kolhapur railway line, which will directly connect Konkan and Western Maharashtra by rail.
नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना थेट रेल्वेने जोडणारा वैभववाडी–कोल्हापूर हा नवा रेल्वे मार्ग लवकरच मार्गी लागण्याच्या दिशेने पावले उचलली जात आहेत. मत्स्यव्यवसाय मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी नवी दिल्ली येथे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासह कोकण रेल्वेसंबंधी अनेक मागण्या मांडल्या. रेल्वेमंत्र्यांनी या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक सहकार्य व तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
वैभववाडी–कोल्हापूर रेल्वे मार्गाची वैशिष्ट्ये
हा प्रस्तावित रेल्वे मार्ग सुमारे १०८ किमी लांबीचा असून वैभववाडी ( रोहा–मडगाव विभाग ) ते कोल्हापूर ( पुणे–कोल्हापूर विभाग ) असा असेल. गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या या मार्गामुळे कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरीसारखे किनारी जिल्हे थेट पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरशी रेल्वेने जोडले जातील.
आर्थिक आणि औद्योगिक लाभ या मार्गामुळे प्रवासाचा वेळ आणि खर्च दोन्ही कमी होणार आहेत.
मत्स्य उद्योग : कोकणातील मत्स्यव्यवसायाला थेट रेल्वे वाहतूक उपलब्ध होऊन निर्यात-आयात सोयीस्कर होईल.
नवे औद्योगिक क्षेत्र : कोल्हापूर मार्गे जलमार्ग आणि रेल्वे यांची दुहेरी जोडणी मिळाल्याने कोकणातील उद्योग, पर्यटन, तसेच इम्पोर्ट-एक्स्पोर्ट धोरणाला नवा वेग मिळेल.
स्थानिक अर्थव्यवस्था : व्यापारी, शेतकरी व सामान्य प्रवासी यांना जलद आणि स्वस्त वाहतुकीची सुविधा मिळाल्याने कोकणाच्या अर्थव्यवस्थेला मोठा चालना मिळेल.
कोकण रेल्वेसंबंधी इतर मागण्या
या भेटीत राणे यांनी कोकणातील प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक महत्त्वाच्या मागण्या मांडल्या. त्यात सिंधुदुर्ग परिसरातील स्थानकांवर १६ एक्स्प्रेस गाड्यांचे थांबे, कोइंबतूर, नागरकोईल आणि मडगाव एक्सप्रेसला कणकवली थांबा, मांडवी एक्सप्रेसला नांदगाव थांबा, मडूरे व सावंतवाडी येथून विशेष गाड्यांची सोय, पीआरएस काउंटर वाढवणे, स्थानकांचे आधुनिकीकरण, तुतारी एक्सप्रेसच्या डब्यांमध्ये वाढ अशा प्रवासी-सुविधांचा समावेश आहे. रेल्वे प्रशासनाने या सर्व मागण्यांवरही सकारात्मकता दर्शवली आहे.
कोकणवासीय आणि कोल्हापूरकरांची अनेक दशकांपासूनची थेट रेल्वे जोडणीची मागणी या प्रकल्पामुळे पूर्ण होण्याची शक्यता आहे. रेल्वेमंत्री वैष्णव यांनी या प्रकल्पाला गती देण्यासाठी तातडीची कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यामुळे लवकरच प्रत्यक्ष काम सुरू होण्याची अपेक्षा आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास कोकण–पश्चिम महाराष्ट्र प्रवासात नवा अध्याय सुरू होईल आणि स्थानिक तसेच राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळेल.