प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
राज्यातील इतर भागांच्या तुलनेत कोकणात संघटनात्मकदृष्ट्या कमकुवत असलेल्या भाजपने गेल्या काही वर्षांत राबवलेल्या पक्षबांधणीच्या धोरणाचा सकारात्मक परिणाम जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये दिसून आला आहे. रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत भाजपने उल्लेखनीय वाढ नोंदवली असून रत्नागिरीतही पक्षाची उपस्थिती वाढली आहे.
कोकणात अपेक्षित विस्तार साधता न आल्याची जाणीव ठेवून भाजपने विविध पक्षांतील प्रस्थापित व जनाधार असलेल्या नेत्यांना पक्षात प्रवेश देत संघटन मजबूत करण्यावर भर दिला. रायगड जिल्ह्यात धैर्यशील पाटील, रवीशेठ पाटील, सुभाष पाटील, आस्वाद पाटील, सुरेश लाड, देवेंद्र साटम, जे. एम. म्हात्रे यांसारखे नेते भाजपमध्ये दाखल झाले. तळ कोकणात नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढली.
या संघटनात्मक बांधणीचे फलित नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत दिसून आले. रायगड जिल्ह्यात २०१७ मध्ये भाजपचे केवळ तीन सदस्य निवडून आले होते, यंदा ही संख्या १५ वर पोहोचली असून १२ सदस्यांची वाढ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात २०१७ मध्ये भाजपचे सहा सदस्य होते, यावेळी तब्बल २७ सदस्य निवडून आले असून पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात भाजपचे चार सदस्य निवडून आले आहेत.
शिवसेना शिंदे गट आणि भाजप युतीने ही निवडणूक एकत्र लढवली. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यांत मिळून भाजपचे एकूण ४६ सदस्य निवडून आले आहेत. रायगड जिल्ह्यात निर्माण झालेल्या त्रिशंकू स्थितीत सत्ता स्थापनेसाठी भाजपची भूमिका निर्णायक ठरणार आहे. शिवसेना शिंदे गट किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना सत्ता स्थापनेसाठी भाजपची साथ आवश्यक ठरण्याची शक्यता आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपचा अध्यक्ष होणार असल्याचे स्पष्ट झाले असून रत्नागिरीतही युतीची सत्ता येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे कोकणातील तिन्ही जिल्हा परिषदांमध्ये भाजप सत्तेत सहभागी होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.






