कोल्हापूर : प्रसारमाध्यम डेस्क
कोल्हापुरात नवरात्रोत्सवात कोहळा पंचमी साजरी केली जाते. ललीत पंचमी दिवशीच कोहळा फोडण्याचा विधी केला जातो म्हणून या विधीला कोहळा पंचमी असेही म्हणतात. मात्र यावर्षी नवरात्रोत्सव एकूण बारा दिवसाचा आहे. ललित पंचमी नवरात्रोत्सवाच्या पाचव्या दिवशी असते. आज -२६ सप्टेंबर ललित पंचमी आहे. मात्र पहिल्यांदाच ललित पंचमी दिवशी कोहळा फोडण्याचा विधी नाही. हा विधी उद्या २७ सप्टेंबरला आहे. या विधीपासून त्र्यंबोलीदेवीची यात्रा सुरु होते.
दरवर्षी ललिता पंचमीनिमित्त म्हणजेच नवरात्रौत्सवाच्या पाचव्या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाई तिची प्रिय सखी त्र्यंबोली देवीला भेटायला जाते, अशी आख्यायिका आहे. हा दिवस अंबाबाईने कोल्हासूराचा वध केला ती ही तिथी. कोल्हासूराने मरताना एक वर मागितला, वधाची स्मृती म्हणून दरवर्षी कोहळा फोडला जावा. त्याला दिलेल्या वराप्रमाणे अंबाबाई दरवर्षी कोहळ्याचा बळी आपल्या मंदिरात देत असे. कोल्हासूराचा नातू कामाक्ष याने तप करून कपिलमुनींकडून योगदंड मिळवला होता. त्याच्या प्रभावाने त्याने हा सोहळा करण्यासाठी जमलेल्या सर्व देवांचे बकऱ्यांमध्ये रूपांतर केले. त्र्यंबोलीने स्वचातुर्याने कामाक्षाचा वध केला व देवांची मुक्तता केली. मात्र, या आनंदात देव त्र्यंबोलीला विसरले. तेव्हा अंबाबाई तिची समजूत घालायला तिच्या दारी गेली आणि प्रेमाने तिची समजूत घातली. शिवाय कोहळा बळीचा मान दिला. त्या वरा प्रमाणे अंबाबाई हत्तीवर बसून त्र्यंबोली भेटीला जाते.

या आख्यायिकेनुसार गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापुरात कोहळा फोडण्याचा सोहळा पार पाडतो. त्यासाठी दरवर्षी अंबाबाई त्र्यंबोली देवीच्या भेटीसाठी निघते. तोफेची सलामी झालेनंतर पालखी पूर्व दरवाजातून पायघड्यावरुन चालत निघते. चोपदार, रोशननाईक, हवालदार तसेच समितीचे अध्यक्ष, सदस्य, अधिकारी व देवस्थानचे श्री पूजक यांच्यासह सर्वच महत्वाच्या व्यक्ती नेहमी पालखीसोबत जात असतात.
कोहळा फोडण्याचा सोहळ्या दिवशीच त्र्यंबोली देवीची यात्रा भरते. याच दिवसापासून अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रसह कर्नाटक, आंद्र्प्रदेश, तेलंगणा, मध्यप्रदेश येथून भाविक येतात. त्र्यंबोली देवीच्या यात्रेला कोल्हापूर जिल्ह्यासह सातारा, सांगली, कर्नाटक येथून भाविक येतात. यात्रेला प्रचंड गर्दी होते. ही यात्रा विजया दशमी पर्यंत सुरु असते.