कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कोल्हापूरची कन्या सुदिक्षा पिसे हिने दक्षिण कोरियात पार पडलेल्या १८ व्या जागतिक तायक्वांदो कल्चर एक्सपो २०२५ या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत दोन सुवर्णपदकांची कमाई केली आहे. तिच्या या अभूतपूर्व यशामुळे कोल्हापूरची मान उंचावली असून आज कोल्हापुरात परतल्यानंतर तिचे भव्य स्वागत करण्यात आले.
या स्पर्धेत २५ हून अधिक देशांनी सहभाग नोंदवला होता. अत्यंत चुरशीच्या स्पर्धांमध्ये सुदिक्षाने आत्मविश्वास, शिस्त, आणि तंत्रशुद्ध कामगिरीच्या जोरावर दोन सुवर्णपदक पटकावली. ती होली क्रॉस इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी असून तिच्या कामगिरीचा संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याला अभिमान वाटतो.

सुदिक्षा हिला हे यश तिच्या कठोर परिश्रमासोबतच प्रशिक्षक अमोल भोसले आणि ग्रँडमास्टर निलेश जालनावाला यांच्या मार्गदर्शनामुळे मिळाले. तिने सातत्याने सराव करून स्वतःला तयार केले आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दमदार कामगिरी केली.
आज कोल्हापुरात तिच्या आगमनानंतर विमानतळावरून ते घरापर्यंत तिचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात, फुलांची उधळण करत आणि टाळ्यांच्या गजरात तिची मिरवणूक काढण्यात आली.
कोल्हापुरातील खेळाडूंनी आजवर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आता सुदिक्षा पिसे हिचे नावही त्या तेजस्वी परंपरेत समाविष्ट झाले आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी कोल्हापूरकरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
या स्वागत प्रसंगी सुशांत पिसे, दत्तात्रय पिसे, अभिजीत पिसे, मिलिंद पिसे, संपदा पिसे, चेतन पिसे, अभिषेक विंचू आणि पिसे कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते. सर्वांनी तिच्या या यशाचा अभिमान व्यक्त करत भावनिक क्षण अनुभवले.
———————————————————————————-