spot_img
शुक्रवार, नोव्हेंबर 7, 2025

9049065657

Homeआंतरराष्ट्रीयकोल्हापूरच्या 'स्वीट मून' लघुपटाची आंतरराष्ट्रीय झेप

कोल्हापूरच्या ‘स्वीट मून’ लघुपटाची आंतरराष्ट्रीय झेप

स्टुटगार्ट फिल्म फेस्टिवलमध्ये स्पर्धात्मक विभागात निवड

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

कोल्हापूरच्या मातीत घडलेल्या आणि वैशिष्ट्यपूर्ण दृश्यकाव्य शैलीत संवेदनशील मनांना भिडणाऱ्या ‘स्वीट मून’ (Sweet Moon) या लघुपटाने जागतिक स्तरावर मोठी घवघवीत कामगिरी केली आहे. २३ ते २७ जुलै २०२५ या कालावधीत जर्मनीतील स्टुटगार्ट येथे होणाऱ्या २२ व्या ‘ द इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ स्टुटगार्ट ‘ या प्रतिष्ठेच्या महोत्सवात ‘स्वीट मून’ ला स्पर्धात्मक विभागात अधिकृत निवड झाली आहे. विशेष म्हणजे कोल्हापुरात तयार झालेल्या लघुपटाला असा मान प्रथमच मिळाला आहे.

दिग्दर्शक मयूर प्रकाश कुलकर्णी यांना यानिमित्ताने महोत्सवासाठी थेट जर्मनीत अधिकृत निमंत्रण मिळालं आहे. त्यांच्या आणि संपूर्ण कोल्हापूरच्या कलाविश्वासाठी ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे.

जागतिक स्तरावर ‘स्वीट मून’ ची यशोगाथा 

‘स्वीट मून’ या पंधरा मिनिटांच्या लघुपटाने यापूर्वी चीन, इंग्लंड, ब्राझिल, पोलंड, पेरू, अझरबैजान, बल्गेरिया, क्वालांल्मपूर, अथेन्स आदी ठिकाणी होणाऱ्या चित्रपट महोत्सवांमध्ये सहभाग घेतला आहे. या लघुपटाने अनेक ठिकाणी ‘उत्कृष्ट लघुपट’ तसेच ‘उत्कृष्ट छायाचित्रण’ या श्रेणीत पुरस्कार मिळवत कोल्हापूरचं आणि भारताचं नाव उज्वल केलं आहे. राष्ट्रीय पातळीवर ही अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये ‘स्वीट मून’ च्या कलात्मकतेला आणि सृजनशीलतेला मान्यता मिळाली आहे.

स्टुटगार्ट महोत्सवातील निवड आणि मयूर कुलकर्णींना मिळालेलं अधिकृत निमंत्रण हे या लघुपटाच्या आतापर्यंतच्या सर्व सन्मानांपैकी सर्वात मोठं यश मानलं जातं आहे.

‘स्वीट मून’ टीमचा ठसा 

या लघुपटाचं छायाचित्रण, संकलन आणि दिग्दर्शन मयूर कुलकर्णी यांनीच केलं आहे. साऊंड डिझाईन महादेव पाटील यांचं आहे, तर कार्यकारी निर्माता म्हणून कौस्तुभ देशपांडे यांनी भूमिका पार पाडली आहे. तसेच शिशिर चौसाळकर, करण चव्हाण, महादेव चांदेकर, रवींद्र सुतार, विक्रम पाटील, ऋषिकेश जोशी आणि साई पोतदार यांचं मोलाचं सहकार्य या लघुपटाला लाभलं आहे.

 ‘बाबुराव पेंटर फिल्म सोसायटी’चं योगदान :

व्यवसायाने कमर्शियल आर्टिस्ट असलेले मयूर कुलकर्णी यांनी ‘भवताल’, ‘ओरिजिन’ आणि ‘स्वीट मून’ असे तीन कलात्मक लघुपट तयार केले आहेत. या तिन्ही लघुपटांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर समीक्षकांची दाद मिळाली आहे. त्यांचा कोल्हापूरच्या ‘कलामहर्षी बाबुराव पेंटर फिल्म सोसायटी’साठीचा प्रदीर्घ योगदानाचा अनुभव त्यांच्या यशामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो.

कोल्हापूरच्या कला आणि सांस्कृतिक परंपरेला मिळालेलं हे जागतिक व्यासपीठ निश्चितच नव्या पिढीतील कलाकारांसाठी प्रेरणादायी आहे. ‘स्वीट मून’ चं हे यश कोल्हापूरच्या सांस्कृतिक नकाशावर एक वेगळा ठसा उमटवत आहे !

——————————————————————————————-

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments