कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कोल्हापुरातील शाहीर दिलीप सावंत आणि त्यांचे सहकारी १ जून रोजी दुबईत आयोजित शिवराज्याभिषेक सोहळ्यात शाहिरी पोवाडे सादर करणार आहेत…
छत्रपती मराठा साम्राज्य ऑर्गनायझेशन आयोजित शिवराज्याभिषेक सोहळा दुबई येथे दि १ जून रोजी होणार असून कोल्हापूरचे शिवशाहीर दिलीप सावंत या सोहळ्यात खास शैलीत पोवाडा सादर करत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणार आहेत.
दुबईतील छत्रपती मराठा साम्राज्य ऑर्गनायझेशन मुख्य आयोजक श्रेयस पाटील, विक्रमसिंह भोसले यांनी शाहीर दिलीप सावंत यांना निमंत्रित केले आहे. या सोहळ्यात त्यांना शाहीर भगवान आंबले, मारूती रणदिवे, हार्मोनियम साथ रत्नाकर कांबळे, ऑर्गन की-बोर्डवर सुदर्शन ढाले तसेच ढोलकी व ऑक्टोपॅडवर अनिकेत ससाणे यांची साथ लाभणार आहे.
शाहीर सावंत यांना या कार्यक्रमात शिवशाहूंचा विचार आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी युवराज मालोजीराजे छत्रपती यांचे पाठबळ लाभले आहे.
शिवशाहिरांनी शिवतीर्थ किल्ले रायगडवर युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखालील शिवराज्याभिषेक सोहळ्यात शाहिरी पोवाड्यातून २९ वर्ष छत्रपती शिवाजी महाराज यांचा जागर अखंडपणे तेवत ठेवला आहे. आतापर्यंत त्यांनी दिल्ली, हिरयाणा, कर्नाटक, गोवा, मुंबई व शिवरायांच्या गडकोटांवर इतर महाराष्ट्रात कार्यक्रम सादर केले आहेत.
—————————————————————————————-






