कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
परंपरेची ओळख आणि मर्दानी रुबाबाची प्रतिक असलेली कोल्हापुरी चप्पल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारणही तसंच आहे. जगप्रसिद्ध फॅशन ब्रँड ‘प्राडा’ ने एका फॅशन शो मध्ये कोल्हापुरी चप्पलसदृश पादत्राण सादर केलं. त्यामुळे कोल्हापूरच्या या वैशिष्ट्यपूर्ण हस्तकलेची आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा दखल घेतली गेली आहे.
पर्यटक कोल्हापूरला आले की, चप्पल लाईनमधून कोल्हापुरी चप्पल घेतल्याशिवाय परत जात नाहीत, इतकी या चप्पलची ओळख खोलवर आहे. सध्या ही चप्पल लाईन पुन्हा एकदा गर्दीने फुललेली दिसत आहे. प्राडाच्या या फॅशन प्रयोगामुळे कोल्हापुरी चप्पलचे आकर्षण नव्याने वाढले असले तरी स्थानिक बाजारपेठेत अपेक्षित तेजी दिसून आलेली नाही, असे येथील विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
प्राडाने कोल्हापुरी चप्पलचा नमुना वापरताच, विक्रेत्यांमध्ये काहीशी अस्वस्थता निर्माण झाली होती. आपली ओळख कुणीतरी लुबाडणार की काय ? मात्र, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सने वेळेवर हस्तक्षेप करत थेट प्राडाशी संवाद साधला. त्यात प्राडाने आपली चूक मान्य करत स्थानिक व्यावसायिकांशी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे.
ही घडामोड कोल्हापुरी चप्पलसाठी सोन्याची संधी ठरली आहे. याआधीही या चप्पलने युरोप, अमेरिका, जपानमध्ये आपली छाप सोडली आहे. मात्र, प्राडाच्या निमित्ताने ही चर्चा नव्या पिढीकडे पोहोचली आहे. सोशल मीडियावर याची चर्चा रंगली असून, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर कोल्हापुरी चप्पलच्या शोधात वाढ झाली आहे.
“टप्यात आला, की करेक्ट कार्यक्रम करतो,” या कोल्हापूरकरांच्या वृत्तीला साजेसेच वर्तन करत, येथील व्यावसायिकांनी प्राडाच्या प्रयत्नाला संधीमध्ये बदलले आहे. आता फक्त प्रश्न एवढाच आहे की, या आंतरराष्ट्रीय चर्चेचा फायदा स्थानिक बाजारपेठेपर्यंत पोहोचतो का ?
जगभरात कोल्हापुरी चप्पलची ओळख अजून बळकट होत असताना, स्थानिक उत्पादक व विक्रेत्यांनीही याचा योग्य फायदा उचलण्याची हीच वेळ आहे, हे निश्चित !
————————————————————————————————-