कोल्हापूर : प्रसारमाध्यम
प्राडा या इटालियन कंपनीने कोल्हापूर जिल्ह्याची ओळख असणारी कोल्हापुरी चप्पल ही लेदर सँडल या नावाखाली प्रदर्शित केली आहे. यांदर्भात केंद्र शासनाकडे पाठपुरावा करुन येथील चर्मकारांना न्याय देण्याची मागणी आज कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या शिष्टमंडळाने खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे निवेदनाव्दारे केली. या निवेदनात “कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेली शेकडो वर्षे कोल्हापुरी चप्पलचे उत्पादन सुरु असून चर्मकार समाजातील अनेक पिढ्यांनी मेहनत घेऊन कोल्हापूर जिल्ह्यापुरती मर्यादित असणारी चप्पल आपल्या कलेच्या जोरावर जगप्रसिध्द केली आहे. या जगप्रसिध्द कोल्हापुरी चप्पलला कोल्हापूर जिल्ह्यासोबतच शेजारी असणाऱ्या जिल्ह्यांनाही भौगोलिक मानांकन मिळालेले आहे म्हणजेच हे मानांकन कोल्हापूर जिल्ह्याला मिळणे गरजेचे असताना शेजारील जिल्ह्यांनाही मिळालेले आहे. त्यामुळे याबाबतीत कोल्हापूरातील चर्मकारांवर आधीच अन्याय झाला आहे”. असे म्हटले आहे.
त्यातच प्राडा या जगप्रसिध्द इटालियन कंपनीने या कंपनीचे २०२६ चे उन्हाळी उत्पादन काय असेल याचे फॅशन शो मध्ये कोल्हापुरी चप्पल हे लेदर सँडल या नावांने प्रसिध्द केले. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील चर्मकारांवर अन्याय झाला असून कोल्हापूर जिल्ह्याची ओळख असणारी ही मऱ्हाटमोळी कोल्हापुरी चप्पल कोणत्याही इतर नावाने प्रदर्शित अथवा विक्री न होता भारतीय कोल्हापुरी या नावाने प्राडा कंपनी मार्फत प्रदर्शित व्हावी, असे खासदार महाडिक यांना सांगितले. याबाबत चेंबर मार्फत प्राडाला मेल करुन त्यांना या उत्पादनाचे नाव ‘कोल्हापुरी चप्पल’ किंवा ‘कोल्हापुरी लेदर सँडल’ म्हणून बदलण्याची विनंती केली आहे, जेणेकरून त्याच्या प्रामाणिक उत्पत्तीस मान्यता मिळेल. तथापी आम्हांस या विषयाबाबतीत राष्ट्रीय स्तरावरुन लक्ष वेधून घेण्यासाठी आपण पाठपुरावा करावा जेणेकरुन येथील हस्तकलेला न्याय मिळेल.
यावर खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेत याविषयी लक्षवेधी मांडून येथील चर्मकारांना निश्चितच न्याय दिला जाईल असे आश्वासन दिले.
यावेळी चेंबरचे अध्यक्ष संजय शेट, उपाध्यक्ष धनंजय दुग्गे, संचालक व फुटवेअर्स असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजीराव पोवार, मानद सचिव अजित कोठारी, खजानिस राहुल नष्टे, संचालक संपत पाटील, फुटवेअर्स असोसिएशनचे राजन सातपुते, सुदाम कांबळे, कुमार महाजन, बाळासाहेब गवळी, साहील डोईफोडे आदी उपस्थित होते.