Google search engine

प्रसारमाध्यम प्रतिनिधी: 


जागतिक लक्झरी फॅशन ब्रँड प्राडानं कोल्हापुरी चपलांसारखी फुटवेअरची नवी रेंज आणण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी कोल्हापुरी चपलांच्या डिझाइनची नक्कल केल्याच्या आरोपांमुळे प्राडावर जोरदार टीका झाली होती. त्या पार्श्वभूमीवर काही महिन्यांनंतर ही घोषणा करण्यात आली आहे.

एका जगप्रसिद्ध वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, प्राडा महाराष्ट्र आणि कर्नाटकात सुमारे 2000 जोड चपला तयार करणार आहे. यासाठी महाराष्ट्रातील लिडकॉम (संत रोहिदास चर्मउद्योग व चर्मकार विकास महामंडळ) आणि कर्नाटकातील लिडकार (डॉ. बाबू जगजीवनराम चर्मउद्योग विकास महामंडळ) या दोन सरकारमान्य संस्थांबरोबर सामंजस्य करार करण्यात आला आहे.

मुंबईतील इटालियन वाणिज्य दूतावासात इटली–भारत व्यापारी परिषदेच्या निमित्ताने या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. ‘प्राडा मेड इन इंडिया – इन्स्पायर्ड बाय कोल्हापुरी चप्पल्स’ या प्रकल्पांतर्गत भारतीय कारागिरीचा सन्मान राखत डिझाइन, अंमलबजावणी आणि मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात आली आहेत.

प्राडाचे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी प्रमुख लॉरेंझो बर्टेली यांनी सांगितले, “आम्ही कोल्हापुरी चपलांच्या मूळ निर्मात्यांनी जपलेली गुणवत्ता आणि आमच्या आधुनिक उत्पादन तंत्रज्ञानाचा संगम साधू.”

या चपलांचा एक जोड सुमारे 939 डॉलर (भारतीय चलनात अंदाजे 85,000 रुपये) किमतीचा असेल, अशी माहिती देण्यात आली आहे. या चपला फेब्रुवारी 2026 पासून प्राडाच्या जगभरातील 40 विक्री केंद्रांमध्ये तसेच अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होतील.

महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि कर्नाटकातील बेळगाव, बागलकोट, धारवाड, बिजापूर या आठ जिल्ह्यांतील पारंपरिक कारागिरांच्या सहभागातून या चपला तयार केल्या जाणार आहेत. 2019 मध्ये कोल्हापुरी चपलांना जिओग्राफिकल इंडिकेशन (GI) टॅग मिळाल्याने त्यांच्या अस्सलतेला आणि सांस्कृतिक महत्त्वाला अधिक मान्यता मिळाली आहे.

जून 2025 मध्ये मिलान फॅशन वीकमध्ये प्राडाच्या ‘मेन्स स्प्रिंग-समर 2026’ कलेक्शनदरम्यान सादर करण्यात आलेल्या चपलांमुळे वाद निर्माण झाला होता. त्या चपला कोल्हापुरीसारख्या दिसत असतानाही शोमध्ये भारत किंवा कोल्हापूरचा उल्लेख टाळण्यात आल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर प्राडानं भारतीय परंपरेपासून प्रेरणा घेतल्याचं मान्य करत जबाबदार पावलं उचलण्याचं आश्वासन दिलं होतं.

आता या नव्या करारामुळे कोल्हापुरी चपलांची जागतिक ओळख अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here