कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात कोल्हापूर जिल्ह्यात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या अनोख्या उपक्रमाने नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या या मोहिमेंतर्गत जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली २८ ऑगस्टपासून आजपर्यंत १५६९ मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. यात ७७ हजार ११८ नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला तर ४ हजार ५०४ रक्तदात्यांनी रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी जपली. विशेष म्हणजे १० हजार ३५२ नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड वितरित करण्यात आले आणि ४ हजार ३२३ जणांनी अवयवदानाची नोंदणी केली आहे. हे अभियान संपूर्ण गणेशोत्सवात राबविण्यात आले असून यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याने राज्यात दुसरा क्रमांक मिळविला आहे तर पुणे पहिल्या क्रमांकावर आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, सार्वजनिक आरोग्य विभाग कोल्हापूर, महात्मा फुले जन आरोग्य योजना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालये आणि धर्मादाय रुग्णालयांतील तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहभागाने हा उपक्रम यशस्वीपणे राबवला जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गणेश मंडळांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला असून, मंडपांजवळील शिबिरांमध्ये गणेशभक्त आणि स्थानिक नागरिकांची मोफत तपासणी केली जात आहे. या शिबिरांमधून उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, कर्करोग यांसारख्या आजारांचे लवकर निदान करुन रुग्णांना मोफत उपचार उपलब्ध करुन दिले जात आहेत.
गणेश मंडळांचा जनजागृतीत मोलाचा वाटा गणेश मंडळांनी बॅनर आणि पत्रकांद्वारे या उपक्रमाची व्यापक जनजागृती केली. परिणामी हजारो नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घेतला. ही मोहीम केवळ तपासणीपुरती मर्यादित नसून, नागरिकांमध्ये सातत्यपूर्ण आरोग्य जागरुकता निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवते. केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य योजनांची माहितीही नागरिकांपर्यंत पोहोचवली जात आहे.
लोकाभिमुख उपक्रमाचा आदर्श मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या समन्वयाने राबवलेला हा उपक्रम जनहिताचा उत्तम आदर्श ठरला आहे. गणेशोत्सवासारख्या सांस्कृतिक उत्सवाला आरोग्यसेवेची जोड देणारी ही अभिनव संकल्पना नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी मैलाचा दगड ठरत आहे.
आरोग्य अभियान : १,५६९ आरोग्य शिबिरांचे यशस्वी आयोजन. ७७,११८ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी. ४,५०४ रक्तदात्यांचा सहभाग. १०,३५२ आयुष्मान भारत कार्ड वितरित. ४,३२३ अवयव दान नोंदणी