
कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
दक्षिण आफ्रिकेतील जगातील सर्वात कठीण समजली जाणारी कॉम्रेड मॅरेथॉन यशस्वीरित्या पूर्ण करत कोल्हापूरच्या खेळाडूंनी जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवला आहे. तब्बल ९० किलोमीटरचे हे अत्यंत खडतर अंतर यशस्वीरीत्या पार करत त्यांनी कोल्हापूरचा गौरव वाढवला आहे.
Brand Kolhapur चे सदस्य श्री. चेतन चव्हाण तसेच त्यांचे सहकारी अमोल यादव, डॉ. विजय कुलकर्णी, दिलीप जाधव, गोरख माळी, सचिन बूरसे, स्वरूप पुजारी, विजय पाटील, अम्रपाल कोहली, सुषमा रेपे, डॉ. केतकी साखरपे आणि डॉ. पराग वाटवे या सर्व धावपटूंनी अपार मेहनत, चिकाटी आणि शारीरिक-मानसिक क्षमतेच्या जोरावर ही कामगिरी गाठली आहे.
कॉम्रेड मॅरेथॉन ही जगातील सर्वात जुनी आणि सर्वात आव्हानात्मक अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा मानली जाते. अत्यंत चढ-उतार असलेल्या मार्गावर, हवामानातील सतत बदल, ९० किलोमीटरचा लांब पल्ला आणि वेळेचे मर्यादित बंधन यामुळे या शर्यतीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कठीण आव्हानाचा सामना करत कोल्हापूरच्या खेळाडूंनी आपली जिद्द व क्षमता सिद्ध केली आहे.
कोल्हापूर हा क्रिडा क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहिला आहे. कुस्ती, जलतरण, धावपटू, मल्लखांब, सायकलिंग यासारख्या विविध खेळांमध्ये येथील खेळाडूंनी देश-विदेशात आपली छाप पाडली आहे. त्यातच आता कॉम्रेड मॅरेथॉन मध्ये यश संपादन करून या खेळाडूंनी कोल्हापूरचे नाव आणखी उज्ज्वल केले आहे.
या सर्व यशस्वी धावपटूंना Brand Kolhapur कडून हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा देण्यात येत आहेत. यशाची ही शिखरे त्यांनी गाठावी आणि पुढील काळात आणखी नवे विक्रम प्रस्थापित करावेत, हीच सदिच्छा !
………………………………………………………………………………………………….





