प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
कोल्हापूर महापालिका निवडणूक : महिलांना मोठे प्रतिनिधित्व, काही प्रभागांत चुरशीची लढत
कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने ४८ उमेदवारांची पहिली यादी शुक्रवारी रात्री जाहीर केली. या यादीतून २९ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून, पक्षाने अनुभव आणि नव्या नेतृत्वाचा समतोल साधण्याचा प्रयत्न के आहेला.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या राज्य निवड मंडळाची बैठक प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस खासदार शाहू छत्रपती, विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
अनुभावींना संधी ….
जाहीर यादीत विधानसभा निवडणूक लढलेले राजेश भरत लाटकर, माजी उपमहापौर भूपाल महिपती शेटे, संजय मोहिते, मधुकर रामाणे, दीपा मगदूम, जयश्री चव्हाण यांच्यासह १६ माजी नगरसेवकांचा समावेश आहे.
महायुतीतील जागावाटपाबाबत चर्चा सुरू असतानाच काँग्रेसने निश्चित उमेदवार जाहीर करून तयारीला वेग दिला आहे.
तीन कुटुंबांत दोन उमेदवार
या यादीत तीन कुटुंबांतील दोन-दोन सदस्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
माजी नगरसेवक इंद्रजीत बोंद्रे प्रभाग क्रमांक ८ मधून, तर त्यांच्या पत्नी मयुरी बोंद्रे प्रभाग क्रमांक २० मधून निवडणूक लढवणार आहेत.
माजी नगरसेवक राहुल शिवाजीराव माने प्रभाग क्रमांक ९ मधून, तर त्यांच्या पत्नी ऋग्वेदा माने प्रभाग क्रमांक ८ मधून रिंगणात असतील.
माजी उपमहापौर भूपाल शेटे प्रभाग क्रमांक १८ मधून, तर त्यांची कन्या पूजा शेटे प्रभाग क्रमांक १३ मधून निवडणूक लढवणार आहेत.
प्रभाग ९ मध्ये लक्षवेधी लढत
प्रभाग क्रमांक ९ मधून काँग्रेसचे उमेदवार राहुल माने यांच्याविरोधात शिंदेसेनेचे शारंगधर देशमुख मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील सर्वांत चुरशीची लढत या प्रभागात पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
उद्धवसेनेच्या जागा वगळून घोषणा
उद्धवसेनेला अपेक्षित असलेल्या १२ जागा वगळूनच काँग्रेसने उमेदवारांची घोषणा केल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.
दिंडोर्ले यांना काँग्रेसचे पाठबळ
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा प्रमुख राजू आनंदराव दिंडोर्ले यांना काँग्रेसने पुरस्कृत केले आहे. तसेच ज्येष्ठ नगरसेवक मधुकर रामाणे यांच्यावर पुन्हा एकदा पक्षाने विश्वास व्यक्त केला आहे.
२४ महिला उमेदवारांचा समावेश
या पहिल्या यादीत २४ महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमा बनछोडे, दीपा मगदूम, जयश्री चव्हाण या माजी नगरसेविकांसह महिलांना मोठे प्रतिनिधित्व देण्यात आले आहे.
शिवाजी पेठेतील उमेदवारी प्रलंबित
शिवाजी पेठेतील काँग्रेसचे इच्छुक अक्षय विक्रम जरग आणि उद्धवसेनेचे राहुल इंगवले यांच्यापैकी कोणाला उमेदवारी द्यायची, याबाबत निर्णय अद्याप झालेला नाही. त्यामुळे ही जागा सध्या प्रलंबित ठेवण्यात आली आहे.
अर्ज भरण्यासाठी गर्दीची शक्यता
महायुतीकडून प्रतिस्पर्धी उमेदवार निश्चित झाल्यानंतर काही प्रभागांतील जागा सर्वसाधारण की मागासवर्गीय ठेवायच्या याचा निर्णय घेतला जाणार आहे. सर्व उमेदवारांना मंगळवारी (३०) एबी फॉर्म देण्यात येणार असून, सोमवारी व मंगळवारी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
उमेदवार यादी (भाग – १)
| प्रभाग क्र. | आरक्षण | उमेदवाराचे नाव |
|---|---|---|
| 1 | सर्वसाधारण महिला | पल्लवी सोमनाथ बोळाईकर |
| 2 | नागरिकांचा मागासवर्ग (महिला) | आरती दीपक शैक्षके |
| 2 | सर्वसाधारण महिला | विद्या सुनील देसाई |
| 2 | सर्वसाधारण | राहुल शिवाजीराव माने |
| 3 | नागरिकांचा मागासवर्ग | प्रकाश शंकरराव पाटील |
| 3 | सर्वसाधारण महिला | किरण स्वप्निल तहसीलदार |
| 4 | अनुसूचित जाती (महिला) | स्वाती सचिन कांबळे |
| 4 | नागरिकांचा मागासवर्ग | विशाल शिवाजी चव्हाण |
| 4 | सर्वसाधारण महिला | दीपाली राजेश घाटगे |
| 4 | सर्वसाधारण | राजेश भरत लाटकर |
| 5 | सर्वसाधारण | अर्जुन आनंद माने |
| 6 | अनुसूचित जाती | रजनीकांत जयसिंह सरनाईक |
| 6 | सर्वसाधारण महिला | तनिष्का धनंजय सावंत |
| 6 | सर्वसाधारण | प्रतापसिंह दत्तात्रय जाधव |
उमेदवार यादी (भाग – २)
| प्रभाग क्र. | आरक्षण | उमेदवाराचे नाव |
|---|---|---|
| 7 | सर्वसाधारण महिला | उमा शिवानंद बनछोडे |
| 8 | नागरिकांचा मागासवर्ग महिला | अक्षता अविनाश पाटील |
| 8 | सर्वसाधारण महिला | ऋग्वेदा राहुल माने |
| 8 | सर्वसाधारण | प्रशांत ऊर्फ भैख्या महादेव खेडकर |
| 8 | सर्वसाधारण | इंद्रजित पंडितराव बौदे |
| 10 | सर्वसाधारण महिला | दीपा दिलीपराव मगदूम |
| 11 | नागरिकांचा मागासवर्ग महिला | जयश्री सचिन चव्हाण |
| 12 | नागरिकांचा मागासवर्ग | रियाज अहमद सुभेदार |
| 12 | सर्वसाधारण महिला | स्थालिया साहिल बागवान |
| 12 | सर्वसाधारण महिला | अनुराधा अभिमन्यू मुळीक |
| 12 | सर्वसाधारण | ईश्वर शांतीलाल परमार |
| 13 | अनुसूचित जाती महिला | पूजा भूपाल शेटे |
| 13 | सर्वसाधारण | प्रवीण हरिदास सोनवणे |
| 14 | नागरिकांचा मागासवर्ग महिला | दिलशाद अब्दुलसत्तार मुल्ला |
उमेदवार यादी (भाग – ३)
| प्रभाग क्र. | आरक्षण | उमेदवाराचे नाव |
|---|---|---|
| 14 | सर्वसाधारण | अमर प्रणव समर्थ |
| 14 | सर्वसाधारण | विनायक विलासराव फाळके |
| 15 | सर्वसाधारण महिला | अश्विनी अनिल कदम |
| 15 | सर्वसाधारण | संजय वसंतराव मोहिते |
| 16 | नागरिकांचा मागासवर्ग | उमेश देवाप्पा पोवार |
| 16 | सर्वसाधारण | उत्तम ऊर्फ भैय्या वसंतराव शेटके |
| 17 | अनुसूचित जाती महिला | अर्चना संदीप बिरांजे |
| 17 | सर्वसाधारण महिला | शुभांगी शशिकांत पाटील |
| 17 | सर्वसाधारण | प्रवीण लक्ष्मणराव केसरकर |
| 18 | अनुसूचित जाती महिला | अरुणा विशाल गवळी |
| 18 | सर्वसाधारण | भूपाल महिपती शेटे |
| 18 | सर्वसाधारण | सर्जेराव शामराव साळुंखे |
| 19 | अनुसूचित जाती | दुर्वास परशुराम कदम |
| 19 | सर्वसाधारण | मधुकर बापू रामाणे |
| 20 | अनुसूचित जाती महिला | जयश्री धनाजी कांबळे |
| 20 | नागरिकांचा मागासवर्ग महिला | उत्कर्षा आकाश शिंदे |
| 20 | नागरिकांचा मागासवर्ग | धीरज भिवा पाटील |
| 20 | सर्वसाधारण महिला | मयूरी इंद्रजित बोंद्रे |
| 20 | सर्वसाधारण | राजू आनंदराव दिंडोर्ले (पुरस्कृत) |





