कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
“औद्योगिक विकासाच्या नव्या पर्वात कोल्हापूरचा वाटा अधिक प्रभावी व्हावा, यासाठी कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि तत्सम नव्या तंत्रज्ञानासाठी विशेष मोहीम हाती घ्यावी,” असे स्पष्ट आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले.
कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या ७८ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. त्यांनी सभासद, उद्योजक, पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या आणि कोल्हापूरच्या औद्योगिक परंपरेला अधिक गतिमान करण्यासाठी नवोन्मेषाच्या दिशेने पुढे जाण्याचे आवाहन केले.

“कोल्हापूरसारख्या औद्योगिक शहरात नव्या संधी ओळखून, जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची गरज आहे. यासाठी AI, ऑटोमेशन, मशीन लर्निंग यासारख्या संकल्पनांना मूर्त स्वरूप द्यायला हवे. हे व्यासपीठ वापरून असोसिएशनने अशी ठोस दिशा ठरवावी आणि एक सामूहिक मोहीम राबवावी,” असे सतेज पाटील यांनी नमूद केले.
या कार्यक्रमात असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी, उपाध्यक्ष श्रीकांत दुधाणे, सेक्रेटरी कुशल सामाणी, ट्रेझरर प्रसन्न तेरदाळकर, संचालक संजय अंगडी, दिनेश बुधले, नितीन वाडीकर, सचिन मेनन, बाबासो कोंडेकर, अतुल आरवाडे, हर्षद दलाल, अमर करांडे, अभिषेक सावेकर, जयदीप मांगोरे यांच्यासह असोसिएशनचे अनेक पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाला उत्साही प्रतिसाद लाभला. औद्योगिक सहकार्य, नवकल्पना आणि आधुनिकतेकडे वाटचाल करणाऱ्या या असोसिएशनला सतेज पाटील यांच्या या मार्गदर्शनाने नवा आयाम लाभेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त झाली.
————————————————————————————