spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeसामाजिककोल्हापूरची हद्दवाढ ५४ वर्षांपासून रखडलेली

कोल्हापूरची हद्दवाढ ५४ वर्षांपासून रखडलेली

अजित पवारांची पुण्यात तीन नव्या मनपांची घोषणा

कोल्हापूर : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज ( ८ ऑगस्ट ) पुण्यातील चाकण दौऱ्यात पुणे जिल्ह्यात तीन नव्या महानगरपालिकांची घोषणा केली. सध्या पुणे महानगरपालिका (पीएमसी) आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) अशा दोन मनपा आहेत. आता मांजरी-फुरसुंगी-उरळी देवाची परिसर, चाकण व परिसर तसेच हिंजवडी व परिसरासाठी स्वतंत्र महानगरपालिका स्थापन करण्याची घोषणा पवार यांनी केली. या निर्णयानंतर पुणे जिल्ह्यात पाच मनपा होतील.
दरम्यान, पुण्याची हद्दवाढ वेळोवेळी होत असताना कोल्हापूरची हद्दवाढ मात्र गेल्या ५४ वर्षांपासून रखडलेली आहे. १९७२ मध्ये नगरपालिका मनपा झाली, पण एक इंचही हद्द वाढली नाही. मनपाच्या मर्यादित उत्पन्नामुळे शहर विकासाच्या अनेक योजना अडकल्या आहेत, तर केंद्र-राज्याच्या कल्याणकारी योजनांमध्ये लोकसंख्येचा मुद्दा अडसर ठरत आहे. आतापर्यंत १३ ते १४ प्रस्ताव शासन दरबारी पाठवले गेले, कधी ४२ गावे, तर कधी २० किंवा आता ८ गावांचा समावेश करण्याचा विचार झाला, पण प्रत्यक्षात एकाही प्रस्तावाची अधिसूचना निघालेली नाही.
२०१६ मध्ये कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण स्थापन झाले, पण निधीअभावी ते निष्क्रियच राहिले. तत्कालीन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०१७ मध्ये पुन्हा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना दिल्या, तरीही हालचाल ठप्प आहे. यामागे स्थानिक आमदार-नेत्यांची ‘सोयीची भूमिका’ अडसर ठरल्याचे आरोप आहेत. करवीर, दक्षिण व उत्तर कोल्हापूरच्या आमदारांमध्ये हद्दवाढीबाबत मतभेद स्पष्ट दिसतात.
वाहतूक कोंडीने कोल्हापूरचा श्वास गुदमरला आहे. अंबाबाईच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक, सुट्टीच्या दिवशी लाखोंचा ओघ येतो. चिंचोळे रस्ते, अपुऱ्या पार्किंगची सोय आणि रिंग रोड-अल्प पर्यायी रस्त्यांचा अभाव यामुळे शहर ठप्प होण्याची वेळ येते. शंभर कोटींच्या निधीतून सुरू असलेली रस्त्यांची कामे पावसात निकामी ठरत आहेत.
दरम्यान, कोल्हापूरकरांनी दिलेल्या ४२ वर्षांच्या लढ्यानंतर सर्किट बेंचची अधिसूचना अखेर निघाली असून १८ ऑगस्ट पासून कार्यरत होणार आहे. त्यामुळे सहा जिल्ह्यातील पक्षकार, वकील यांची गर्दी वाढणार असून शहराच्या पायाभूत सुविधांचा विस्तार तातडीचा झाला आहे. तज्ज्ञांच्या मते, हद्दवाढ हीच शहराच्या कोंडीचा फास सोडवण्याची किल्ली असून वेशीवरील गावांच्या भीतीचे निरसन करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि मनपा प्रशासनाने पुढाकार घेणे अपरिहार्य आहे.

—————————————————————————————————

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments