बर्मिंगहॅम : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
बर्मिंगहॅम येथील ऐतिहासिक एजबेस्टन मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना रंगतदार स्थितीत पोहोचला आहे. भारतीय संघाने इंग्लंडला पहिल्या डावात ४०७ धावांवर गुंडाळत १८० धावांची मोठी आघाडी मिळवली. त्यानंतर भारताने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत १ विकेटच्या मोबदल्यात ६४ धावा केल्या. भारताची एकूण आघाडी आता २४४ धावांवर पोहोचली आहे.
चौथ्या दिवशी केएल राहुल आणि करुण नायर यांनी खेळाला सुरुवात केली. केएल राहुलने आपल्या संयमित आणि तंत्रशुद्ध खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. तिसऱ्या दिवशी नाबाद २८ धावांवर असलेल्या राहुलने चौथ्या दिवशी आणखी २२ धावा जोडत कसोटी कारकिर्दीतील १८ वं अर्धशतक पूर्ण केलं. यानंतर राहुलने आणखी एक धाव घेतल्यानंतर एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला.
केएल राहुल ने हे अर्धशतक करत भारताचे माजी सलामीवीर आणि सध्याचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा विक्रम मोडला आहे. गंभीरने आपल्या कसोटी कारकिर्दीत १७ अर्धशतकांची नोंद केली होती. राहुलने त्याच्या पुढे जात आता १८ अर्धशतकांची मजल मारली आहे.
राहुलचा हा खेळ भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत असून, भारताची आघाडी अधिक भक्कम करण्याच्या दृष्टीने त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.
भारताकडे आधीच भक्कम आघाडी आहे आणि चौथ्या दिवशी राहुल-नायर जोडीने मजबूत सुरुवात करून भारताची पकड अधिक मजबूत केली आहे. भारताला हा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याची संधी आहे आणि राहुलच्या या विक्रमी खेळीने त्यासाठी पायाभरणी केली आहे.
————————————————————————————–



