मुंबई : विशेष प्रतिनिधी
राज्यात खरीप हंगामाला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरु आहे. मात्र काही भागात पावसात पडलेला खंड तर काही भागात अतिपावसाने जमिनीच्या वाफश्या अभावी पेरण्या संथगतीने सुरु असल्याचे चित्र आहे. सध्यस्थितीत राज्यातील खरीपाच्या एकूण १४४ लाख ३६ हजार हेक्टर क्षेत्रापैकी २८ लाख ७५ हजार हेक्टर म्हणजे केवळ वीस टक्के क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.
यंदा मे महिन्यात मान्सूनपुर्व पावसाने राज्याला झोडपून काढले होते. या पावसाने राज्यातील ७५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. मे महिन्यातच सरासरी १८७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. अवकाळी पाऊस आणि त्यापाठोपाठ दाखल झालेल्या मान्सूनच्या पावसामुळे शेतशिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिल्याने शेतकऱ्यांना मशागतीची कामे करता आली नव्हती. दुसरीकडे काही भागात पावसात खंड पडल्याने खरीपाच्या पेरण्यांना विलंब झाल्याचे दिसून आले. त्यातच मान्सून पुर्णपणे सक्रीय झाला नसल्याचे म्हणत कृषि विभागाकडून शेतकऱ्यांना पेरणीसाठी घाई न करण्याचे आवाहन करण्यात आल्याने खरीपाच्या पेरण्या रखडल्याचे दिसून आले. मात्र सध्या जमीनीला वाफसा मिळेल त्याप्रमाणे राज्यात ज्वारी, मका, सोयाबीन, बाजरी, मूग, उडीद आदी पिकांची पेरणी सुरु आहे. तर भात व नाचणी पिकांच्या रोपवाटिका तयार करण्याची कामे सुरु आहेत.
सध्या राज्यातील खरीपाच्या एकूण क्षेत्रापैकी पुणे विभागात सर्वाधिक ३३ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. तर कोकण (३.८३ % ), नाशिक (२४.५७ %) कोल्हापूर (१८.४३%) , छत्रपती संभाजीनगर (२९.१३%), अमरावती विभागात (१३.३७%), नागपूर (२.५५ %) विभागात पेरण्या पुर्ण झाल्याची कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.