Google search engine

प्रसारमध्यम डेस्क :


पूर्वजपूजेची प्रथा सर्व भारतभर प्राचीन काळापासून रूढ आहे. पूर्वजाच्या मृत्यूनंतर त्याला देव्हाऱ्यावर पुजले जाते. कोणी ही पूजा मुखवट्याच्या स्वरूपात करतात, तर कोणी सोन्याचांदीचे “टाक’ तयार करून पूजा करतात आणि आपल्या पूर्वजांची स्मृती जपतात. तसेच पूर्वजांच्या मृत्यूनंतर थडगे बांधतात, त्यावर पादचिन्ह अगर लिंगप्रतिमा कोरतात. काही ठिकाणी वीरगळीच्या स्वरूपात पूजा केली जाते.

आज जरी खंडोबाच्या मंदिरात वेगवेगळ्या स्वरूपाच्या मूर्ती आढळत असल्या, तरी प्रत्येक मंदिरात लिंगप्रतिमा आहेत. कर्नाटकातील देवराहिप्परगी, कारमनी या ठिकाणी खंडोबाचे पितळी “टाक’ आहेत. जेजुरीलाही “टाक’ आहेत. या संदर्भात डॉ. रा. चिं. ढेरे लिहितात, “”वीरपुरुषाचे दैवतीकरण होणे शक्‍य आहे. भारतीय देवता-संभारात अशा अनेक प्रसिद्ध-अप्रसिद्ध देवता आहेत, की ज्या मूलतः मनुष्यरूपाने इतिहासावर ठसा उमटवून गाजल्या आहेत. प्रत्यक्ष कर्नाटकातच “वीरगळ’ नामक अनेक स्मृती-शिला स्थानिक वीरांच्या स्मरणार्थ पूजिल्या जातात. देवता-विज्ञानातील या विवक्षित प्रक्रियेप्रमाणे खंडोबाची निर्मिती झाली असणे शक्‍य नाही.’

याच संदर्भात एक तरुण संशोधक डॉ. नीरज साळुंखे आपल्या “दैत्यबळी व कुंतलदेश महाराष्ट्र’ या ग्रंथात लिहितात, “”राष्ट्रकुटांच्या दख्खनवर सत्ता प्रस्थापित झाल्यावर कर्नाटकमध्ये योद्‌ध्यांच्या स्मरणार्थ वीरगळ उभारण्याच्या प्रथेस महत्त्व प्राप्त झाल्याचे दिसते. गदग-बेटगेरी, रोन, अन्निगेरी, बेन्टूर, सिरूरजा, यल्लीसिरूर इत्यादी उत्तर कर्नाटकातील स्थलांतर राष्ट्रकुटांचे वैविध्यपूर्ण वीरगळ मिळालेले आहेत. यातील गदग-बेटगिरी या धारवाड जिल्ह्यातील स्थळी सोळा वीरगळ सापडले आहेत. ज्या स्थळी हे वीरगळ सापडलेले आहेत, त्यास “मल्लरायण कट्टे’ असे म्हटले जाते. ही बाब ध्यानात घेता खंडोबा मुळात शूर वीर होता, त्याच्या मृत्यूनंतर त्याला देवत्व देऊन लिंग, टाक, वीरगळ स्वरूपात त्याची पूजा सुरू झाली.

माणिक धनपालवार लिहितात, “”श्रेष्ठ नायकाच्या मृत्यूस्थळी समाधी बांधून लिंगस्थापना करतात किंवा वीरगळ उभारतात. मैलार हा देव मूलतः लिंगरूपात होता. एकदा लिंगस्थापना झाली, की भक्त पूजाअर्चा करतात. माहात्म्यपर स्तोत्रे, पदे रचली जातात, प्रतिवर्षी जत्रा भरते, त्या दैवतांची प्रसिद्धी उत्तरोत्तर वाढत जाते आणि हळूहळू एक पंथपरंपरा मूळ धरू लागते.”

मूळ आंध्र तेलंगणातील मल्लणा गोल्ला गवळी लोकांचा शूर वीर-नायक-पराक्रमी वीर होता. आंध्रातून प्रथम बिदरजवळील प्रेमपूर येथे आला आणि तिथे स्थिरावला. जेजुरी ही खंडेरायाची राजधानी आहे असे महाराष्ट्रातील भक्त मानत असले, तरी प्रेमपूर हेच त्याचे मूलस्थान आहे अशी भक्तांची दृढ धारणा आहे. बिदरजवळच्या प्रेमपुरात गेल्यावर तेथील मंदिराच्या विशाल परिसरात विखुरलेले उद्‌ध्वस्त अवशेष पाहिले असता, या मंदिराच्या गतवैभवाच्या अनेक खाणाखुणा दिसू लागतात. आंध्रातील अयरअल्ली मंदिरातील चौसष्ट खांबांचा भव्य दगडी नृत्यमंडप पाहून एके काळी तेथे चालणाऱ्या (वाघ्यामुरळी) ओग्गया मुरुळीच्या नृत्यसाधनेची प्रचिती येते.

अवतारकल्पनेवर कठोर प्रहार करणारे महात्मा फुले खंडेरायाकडे शंकराचा अवतार म्हणून बघणे शक्‍यच नव्हते. खंडेराया इतिहासकाळातील पराक्रमी व्यक्तिमत्त्व होते ते सांगताना म. फुले यांच्या सत्यशोधक, संशोधक दृष्टीचा प्रत्यय येतो. भोळेभाबडे श्रद्धाशील भक्त खंडेरायाकडे कोणत्याही दृष्टीने पाहोत; पण संशोधक अभ्यासकांनी खंडोबाकडे कसे बघावे, हे सांगणारे फुले अभिनिवेशी निश्‍चितच नव्हते, याचा अनुभव खंडेरायाचा अभ्यास करताना येतो.

               II  समाप्त  II 

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here