प्रसारमाध्यम डेस्क :
https://youtube.com/shorts/rxVCpcy5DRs?feature=share
खंडोबा हा देव मूळचा आंध्र प्रदेशातला. आंध्र तेलंगणात तो मल्लणा-मल्लिकार्जुन नावाने ओळखला जातो. आंध्रात केतम्मा आणि मेडलम्मा अशा दोन बायका त्याला असून, त्या दोघीही गोपालक- शिकारी जमातीच्या आहेत. कोमरवेल्ली धट्ट मल्लणा, आयरगल्ली येथील धट्ट मल्लणा, वरंगळ येथील कट्ट मल्लणा पेदिपाड (नल्लूर), पेनुगोंडे (अनंतपूर), मल्लालपत्रन ही आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध मंदिरे आहेत. हैदराबाद येथे मुळात मुस्लिम समाजाचा असलेला मल्लणा, नंतर वरंगळ येथे निघून गेल्याचे सांगितले जाते. याशिवाय ओदिल्ला-गणेशपुरी अशा सतरा-अठरा ठिकाणी खंडोबाची भव्य मंदिरे आहेत….
महाराष्ट्रात खंडोबा हे लोकदैवत मानले जाते; अनेकांच्या दृष्टीने तो कुलदैवत म्हणून प्रतिष्ठित आहे. दुसरीकडे विठोबा हे इष्टदेव मानले जातात. अनेक कुलदेवतांना कालांतराने इष्टदेवतांचे स्थान प्राप्त झाले, परंतु खंडोबाला मात्र अशी प्रतिष्ठा मिळाली नाही, अशी खंत काही अभ्यासक व्यक्त करतात.
संतपरंपरेने खंडोबाच्या उपासनेतील काही अनिष्ट प्रथांचे निराकरण करण्यासाठी त्याच्यावर आध्यात्मिक रूपके रचली. ही रूपके लोकमानसात पूर्णपणे रूजली असती, दृढावली असती, तर खंडोबा लोकधर्माच्या चौकटीतून बाहेर येऊन अधिक आध्यात्मिक प्रदेशात प्रविष्ट झाला असता; आणि विठोबाभक्तांप्रमाणे त्याच्या भक्तांची वाणीही अधिक आदरणीय ठरली असती, असे मत डॉ. रा. चिं. ढेरे यांसारखे अभ्यासक मांडतात.
परंतु वस्तुस्थिती अशी की, संस्कृती संक्रमणाच्या तीव्र दाबातही खंडोबाने आपले मूळस्थान सोडले नाही. त्याने ब्राह्मणीकरणाचा मार्ग स्वीकारला नाही आणि आपला लढाऊ, लोकपरंपरेशी निगडित बाणा अबाधित ठेवला. आजही विविध विधी-विधाने, परंपरा आणि लोककथांमध्ये खंडोबाचा मूळ ऐतिहासिक आणि लोकसांस्कृतिक वारसा—जरी अवशेषरूपाने का असेना—जिवंत आहे.
ऐतिहासिक रूपापेक्षा अवतारी रूपाकडे झुकलेली दृष्टी:
हा अवशेष म्हणून टिकून राहिलेला वारसा खंडोबाच्या ऐतिहासिक चरित्राचा शोध घेताना अत्यंत उपयोगी ठरू शकतो. त्यामुळे या परंपरा आजही जपल्या गेल्या आहेत, याचा आनंद संशोधकांनी व्यक्त करायला हवा. मात्र काही अभ्यासकांची दृष्टी या वारशाबाबत ‘हळहळ’ व्यक्त करणारी असल्याने, खंडोबाच्या इतिहासातील वीरपुरुष या रूपाचा अभ्यास करण्याऐवजी अवतारी, पौराणिक बाजूकडे अधिक कल दिसतो.
कर्नाटकातील कन्नड भाषेतील अभ्यासक—डॉ. चिदानंदमूर्ती, डॉ. श्रीनिवास रिती, डॉ. कलबुर्गी, डॉ. एम. बी. नेगिनहाळ—आणि महाराष्ट्रातील मराठी अभ्यासक—ल. रा. पांगारकर, त्र्यं. गं. धनेश्वर, डॉ. माणिकराव धनपलवार, श्री. पांडुरंग देसाई—या काही मोजक्यांचा अपवाद वगळता, इतर बहुतेक संशोधकांनी खंडेरायाला दैवतरूप प्राप्त झाल्यानंतरच्या परंपरा, कथासाहित्य आणि अवतार-कल्पना यांचाच अधिक शोध घेतला.
खंडेरायाच्या अवतारी स्वरूपाचे वर्णन करणे, त्यावरील पुराणकथा आणि धार्मिक कल्पना उलगडणे, यामध्ये त्यांनी विशेष आनंद मानला. परिणामी, खंडेरायाच्या ऐतिहासिक वीरपुरुष म्हणूनच्या वास्तविक चरित्राकडे पुरेशे लक्ष दिले गेले नाही; त्या अंगावर फारसा प्रकाश पडला नाही.
यामुळे खंडोबाच्या इतिहासातील मानवी, वीरशौर्यपूर्ण, सामाजिक आणि सांस्कृतिक भूमिकेचा अभ्यास मर्यादित स्वरूपात राहिला, तर त्याच्या दैविक अवतारी रूपाला मात्र अधिक महत्त्व प्राप्त झाले.
https://youtube.com/shorts/rxVCpcy5DRs?feature=share
पुढील खंडात पाहू. खंडोबाचा आंध्र आणि कर्नाटक मधील इतिहास…..






