On the day of Ashtami, Shri Ai Ambabai, the resident of Karveer, appears before the devotees in the form of Mahishasuramardini.
कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
आज मंगळवार, अश्विन शुक्ल अष्टमीच्या दिवशी करवीर मधील निवासिनी श्री आई अंबाबाई महिषासुरमर्दिनी रूपात भक्तांसमोर प्रकट झाली आहे. मंदिर परिसरात सकाळपासूनच भाविकांची गर्दी आहे, तर प्रत्येक भाविक देवीच्या पराक्रमी रूपाचे दर्शन घेण्यासाठी उत्सुक आहे.
पुराणकथेनुसार, महिषासुराच्या दैत्यरूपी उत्पत्तीच्या वेळी सर्व देव आपले तेज देवतांपासून प्रकट करत एकत्र झाले. शंकराच्या तेजातून देवीचे मुख तयार झाले, यमाच्या तेजातून केस, विष्णूंच्या तेजातून बाहू, चंद्राच्या तेजातून वक्षस्थळ, इंद्राच्या तेजातून मध्य शरीर, वरूणाच्या तेजातून पोटरी व मांडी, पृथ्वीच्या तेजातून नितंब, ब्रह्माच्या तेजातून पाय, सूर्याच्या तेजातून पायाच्या बोटा, वसुच्या तेजातून हाताच्या बोटा, कुबेराच्या तेजातून नाक, दक्ष प्रजापतीच्या तेजातून दात, संध्यांच्या तेजातून भुवया, वायूच्या तेजातून कान तयार झाले.
सर्व देवांनी देवीला आपले शस्त्र व आभूषण दिले. शंकराने त्रिशूल, विष्णूने चक्र, वरूणाने शंख, अग्नीने शक्ती, वायूने धनुष्यबाण, इंद्राने वज्र आणि घंटा, यमाने दंड, प्रजापतीने अक्षमाला, ब्रह्मदेवाने कमंडलू, सूर्याने तेज, मृत्यूने ढाल व खडग, क्षीरसागराने शुभ्र हार व कधी न मळणारी वस्त्रं, किरीट, कुंडल, चंद्र व बाजूबंद दिले. विश्वकर्माने परशू, समुद्राने फुलमाला व कमळ, हिमालयाने सिंह, रत्नागिरी कुबेराने पानपात्र, शेषनागाने नागहार दिला.
महिषासुराने कात्यायन ऋषींच्या आश्रमात धावत जाऊन देवीला त्रस्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु देवीने आपल्या सिंहासह महिषासुराच्या सैन्याला पराभूत केले. शेवटी महिषासुर रेड्याच्या शरीरात असताना देवीने त्याचे मस्तक उडवले, त्रिशूलाने त्याचे शरीर संपूर्ण नष्ट केले आणि संपूर्ण अधर्माचा नाश केला.
आज या महिषासुरमर्दिनी रूपात करवीर निवासिनी भक्तांच्या समोर विराजमान आहे. करवीरमधील तंत्र चुडामणी ग्रंथानुसार, क्षेत्रातील शक्तीपीठ देवता म्हणून ही चतुर्भुजा महिषासुरमर्दिनी रूपातील पूजा महाष्टमीला दरवर्षी पारंपरिक पद्धतीने केली जाते. आज अष्टमीचे हवनही मंदिरात भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
भक्तजन देवीच्या चरणी प्रार्थना करीत आहेत की, “श्रीमातृ चरणारविंदस्य दास प्रसन्नसशक्तिकः” ही जगदंबा महिषासुराचा संहार करून आपल्याला उत्तम आरोग्य, समृद्धी आणि आयुष्य प्रदान करो.