Today is the 138th birth anniversary of Karmaveer Bhaurao Patil.
कोल्हापूर : प्रसारमाध्यम डेस्क
ज्या गावात पायवाटीचाच रस्ता आहे तेथे शाळा. जी मुले अत्यंत गरीब परिस्थितीत आहेत त्यांना शिक्षण. शाळेच्या सारखेही शिक्षण ठिकाणी मुलांची राहण्याची सोय. शाळा, वसतिगृहात मुले, मुली,कोणत्याही जाती, धर्मातील असोत त्यांना प्रवेश आणि ठिकाणी मुलांची राहण्याची सोय. शाळा, वसतिगृहात मुले, मुली,कोणत्याही जाती, धर्मातील असोत त्यांना प्रवेश आणि शिक्षण सारखेच. विद्यार्थ्यांनी कमवायचे आणि शिकायचेही. शंभर वर्षापूर्वी असे अभिनव प्रयोग करणारे शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील होय. आज २२ सप्टेंबर कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज १३८ वी जयंती. यानिमित्त आण्णाच्या थोर कार्याविषयी जाणून घेऊया…!
कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कोल्हापुर जिल्ह्यातील कुंभोज गावी २२ सप्टेंबर १८८७ रोजी झाला. भाऊराव पाटील यांची राहणी अत्यंत साधी होती. खादीचं साधं धोतर आणि नेहरू शर्ट असा पोशाख ते नेहमी करायचे. सुरुवातीच्या काळात खांद्यावर घोंगडी घालत. नंतर घोंगडी गेली आणि हाती काठी आली.
भाऊरावांचं प्राथमिक शिक्षण आजोळी म्हणजेच कुंभोज येथे झालं. वडिलांची कामानिमित्त सातत्याने बदली होत असल्यामुळे पुढील शिक्षण घेण्यात त्यांना अनेक अडचणी आल्या. दहिवडी, विटा याठिकाणी शाळेच्या पटावर त्यांचं नाव होतं. पण वर्गाशी त्यांचा फारसा संबंध यायचा नाही.
विद्यार्थी असल्यापासूनच ते अन्याय आणि विषमता यांच्याविरोधात दंड थोपटून उभे राहत. विटा येथे एके ठिकाणी अस्पृश्यतेच्या अनिष्ट प्रथेतून दलित समाजातील लोकांना पाणी भरण्यास मनाई होती. हा अन्याय सहन न होऊन भाऊरावांनी तेथील रहाट मोडून टाकला.
भाऊराव शिक्षणासाठी १९०२ ते १९०९ दरम्यान कोल्हापुरात होते. ते जैन बोर्डिंगमध्ये राहून माध्यमिक शिक्षण घेऊ लागले.अस्पृश्य मुलांसाठी ‘मिस क्लार्क हॉस्टेल’च्या एका कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. त्यामुळे पुन्हा आंघोळ करण्याचा आदेश जैन बोर्डिंगच्या अधीक्षकांनी दिला. पण भाऊराव पाटील यांना हा आदेश मानण्यास स्पष्ट नकार दिला. याचा परिणाम म्हणून त्यांची जैन बोर्डिंगमधून हकालपट्टी झाली. त्यानंतर ते कोल्हापूर राजवाड्यावर जाऊन राहू लागले. कोल्हापूरच्या राजवाड्यावर राहण्यास मिळाल्यामुळे भाऊराव पाटील यांना छत्रपती शाहू महाराज यांचा खूप सहवास लाभला. महाराजांचे विचार आणि कार्य यांचा खोल ठसा त्यांच्या मनावर उमटू लागला होता. उपेक्षित समाजाबाबत त्यांचा मनात अधिक करूणा निर्माण झाली. त्यांच्या हक्कासाठी व उद्धारासाठी संघर्ष करण्याचं बीज त्याच ठिकाणी त्यांच्या मनात रोवलं गेलं.
Old building of Rayat Educational Institute
कर्मवीर भाऊराव पाटील यांना लोक आदराने आण्णा म्हणायचे. आण्णाना शिक्षकांनी सहावी उत्तीर्ण केलं नाही. त्यामुळे त्यांना मॅट्रीकमध्ये जाता आलं नव्हतं. त्यामुळे शिक्षण थांबवून काही काळ ते मुंबईत दाखल झाले. तिथं मोती पारखण्याची कला शिकण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. पण भाऊरावांना त्या कामात रस आला नाही. यादरम्यान भाऊराव पाटील यांचा विवाहसुद्धा झालेला होता. पण भाऊराव कोणत्याही कामाविना तसाच वेळ घालवत आहेत, हे पाहून त्यांच्या वडिलांनी त्यांची पत्नीदेखत कानउघडणी केली. यानंतर भाऊराव आपलं राहतं घर सोडून सातारा याठिकाणी खासगी शिकवणी घेण्याचं काम करू लागले. काही कालावधीतच साताऱ्यात ते ‘पाटील मास्तर’ म्हणून लोकप्रिय झाले. आण्णानी १९०९ मध्ये दुधगाव याठिकाणी ग्रामस्थांच्या मदतीने दुधगाव विद्यार्थी आश्रम सुरू केला. हा प्रयोग त्यावेळी चांगलाच यशस्वी झाला होता.
आण्णा महात्मा फुले यांना आपला आदर्श मानत असत. त्यांनी सत्यशोधक समाजाच्या चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवला. आपल्या वक्तृत्वगुणांमुळे त्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्यावेळी समाजप्रबोधनासाठीच्या जवळपास सर्वच कार्यक्रमांमध्ये आण्णानी सहभाग घेतला.
अस्पृश्यतेविरुद्ध बंड, वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था, अंधश्रद्धा, कामगारांचा छळ आणि आर्थिक विषमता या विषयांवर ते अत्यंत आक्रमकपणे बोलायचे. यादरम्यान कराड तालुक्यातील काले याठिकाणी झालेल्या सत्यशोधक समाजाच्या परिषदेत भाऊराव पाटील यांनी बहुजनांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक संस्था स्थापन करण्यासंबंधीचा ठराव मंजूर करून घेतला. त्यानुसार ४ ऑक्टोबर १९१९ रोजी रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली. काले याठिकाणी संस्थेमार्फत एक वसतीगृह, एक प्राथमिक शाळा तसंच एक रात्रशाळा काढून शैक्षणिक कार्याची सुरुवात करण्यात आली. १९२४ साली रयत शिक्षण संस्थेचं काले येथून सातारा शहरात स्थलांतर करण्यात आलं. याठिकाणी सर्व जातीधर्माच्या विद्यार्थ्यांसाठी एक मिश्र वसतीगृह सुरू करण्यात आलं. १९२७ मध्ये या वसतीगृहाचं महात्मा गांधी यांच्या हस्ते ‘श्री छत्रपती शाहू महाराज बोर्डिंग हाऊस’ असं नामकरण करण्यात आलं. याठिकाणी सर्व जातीधर्माची मुले एकत्र जेवतात, काम करून एकत्रित शिक्षण घेतात हे पाहून गांधीजींनी त्यांचं कौतुक केलं. गांधीजी त्यावेळी भाऊराव पाटलांना म्हणाले, “भाऊराव, साबरमती आश्रमात मला जे जमलं नाही ते तुम्ही याठिकाणी यशस्वीरित्या करून दाखवलं आहे. तुमच्या कार्यास माझे आशीर्वाद.”गांधीजींच्या हरिजन-सेवक संघाकडून या वसतीगृहाला १९३३ पासून वार्षिक ५०० रुपये इतकी मदत देण्यात येत होती.
काले येथे १९१९ ला स्थापन करण्यात आलेल्या रयत शिक्षण संस्थेचा आज वटवृक्ष झाला आहे. संस्थेच्या तब्बल ७३९ शाखा असून त्यामध्ये सुमारे १६ हजार १७२ कर्मचारी कार्यरत आहेत. संस्थेच्या ४३८ शाळा (त्यापैकी २६ मुलींच्या शाळा), १७ शेतकी शाळा, ४२ महाविद्यालय, ८० वसतीगृह (त्यापैकी २९ मुलींचे वसतीगृह) तसंच ८ आश्रमशाळा आहेत. यामध्ये सध्या सुमारे ४ लाख ५० हजार विद्यार्थी रयत शिक्षण संस्थांच्या विविध शाळा-महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेतात. यामध्ये विद्यार्थ्यांना डिजिटल, क्रीडा कौशल्य विकास, सामाजिक एकोपा याप्रकारचं शिक्षण दिलं जातं. तसंच कमवा व शिका योजनेसह गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याची तरतूदही संस्थेत आहे. याव्यतिरिक्त विविध शैक्षणिक उपक्रमांचं आयोजन संस्थेमार्फत केलं जातं.