पन्हाळा : प्रतिनिधी
जोतिबाच्या नावान चांगभलच्या जयघोषात आज जोतिबा डोंगरची नगर प्रदक्षिणा श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी निघाली. ही नगर प्रदक्षिणा केल्यानंतर चार धाम आणि काशी यात्रा केल्याचे पुण्य मिळते अशी भाविकांची श्रद्धा असते. आज या नगर प्रदक्षिणेला रखरखत्या उन्हात ही महाराष्ट्र, कर्नाटकांतून लाखो भाविकांचा सहभाग होता.
आज जोतिबा मंदिरात सकाळी ९ वाजता अभिषेक आरती करून नगर दिंडी मुख्य मंदिरातूत दक्षिण दरवाजातून मार्गस्थ झाली. अग्रभागी वीणाधारी प्रभाकर भोरे, गोरख डवरी सोबत पताका होत्या. सकाळी नऊ वाजता दिंडी गायमुख तलाव येथे आली. तेथील श्रीशैल मल्लिकार्जुन मंदिरात धार्मिक विधी झाला. दिंडी पुन्हा मार्गस्थ झाली. दिंडी जोतिबा धडस खळा येेथून ती नंदीवन, आंबावन, नागझरी, व्याघजाई तीर्थ, तसेच अष्टतीर्थाचे दर्शन घेऊन मुरगुळा येथे आली. दिंडी पुन्हा दानेवाडी मार्गे सारकाळ येथे आली. गिरोली येथील निनाई मंदिर त्यानंतर एका दगडावर सातार्डेकर शिवारामध्ये बारा ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृती कोरल्या आहेत त्यांचे दर्शन घेऊन पुन्हा गायमुख येथे दिंडी आली. तेथून जोतिबा मंदिरमार्गे पुन्हा मूळमाया यमाई मंदिरात सायंकाळी नगर दिंडी आली.
जोतिबा मंदीरात आज श्रावण सोमवार निमित्त जोतिबा देवाची अलंकारिक खडी सरदारी रूपात पूजा बांधण्यात आली होती. सकाळी ९ ते सांयकाळी ७ वाजेपर्यंत ही नगर प्रदक्षिणा जोतिबा डोंगराभोवती स्थापित असणाऱ्या अष्ट तीर्थ आणि बारा ज्योतिलिंगाचे दर्शन करीत ही नगर प्रदक्षिणा पूर्ण झाली. सलग १० तास आनवाणी जमीनीवर खाली न बसता, डोंगरदऱ्यातून, भजन करीत, महिला गौरिगीते गात टाळ मृदूंगाचा गजर करत मोठ्या संखेन अखंडपणे चालत ही नगर प्रदक्षिणा पुर्ण केली.