प्रसारमाध्यम : पन्हाळा
आज जोतिबा डोंगरावर चार महिन्यानंतर होणारा पहिला पालखी सोहळा मोठया धार्मिक वातावरणात आणि उत्साहात पार पडला त्याचबरोबर खंडेनवमी निमित्त आज दिवे ओवाळणी ,शस्त्र पुजन , घट उठविणचा विधी झाला. धुपारती सोहळ्याने नवरात्र उपवासाची सांगता झाली. चांगभलचा गजर करून ग्रामस्थ, पुजारी आणि भाविकांनी पहिल्या पालखीचे दर्शन घेतले.
आज जोतिबा डोंगरावर पहाटे सुर्योदयापूर्वी दिवे ओवाळणीचा धार्मिक विधी संपन्न झाला. श्री जोतिबा देवाची आज श्रीकृष्ण रुपात महापुजा बांधण्यात आली होती. महाघंटेचा नाद करून सकाळी ९ वाजता खंडेनवमी निमित उंट , घोडे ,वाजंत्री , श्रींचे मुख्य पुजारी, देवसेवकांच्या लवाजम्यासह श्री. जोतिबा देवाचा पहिला पालखी सोहळा मंदिर प्रदक्षिणेसाठी मार्गस्थ झाला. स्थानिक पुजारी आणि भाविकांनी गुलाल खोबऱ्याची उधळण करून चांगभलंचा गजर केला. हलगी कैंचाळ आणि पोलिस बँडने सादर केलेली जोतिबा नावानं चांगभलंची धुन लक्षवेधी ठरली. ढोल, तुतारी, डवर, कैंचाळच्या आवाजाने मंदिर परिसर दुमदुमून गेला. ढोलीची झुलवे ,डवरीची डवरी गीते , म्हालदाराची ललकारी झाली. तोफेच्या सलामीने पालखी सोहळ्याची सांगता झाली.
सकाळी १० वाजता धुपारती सोहळ्याने जोतिबा मंदिरासह इतर मंदिरातील घट उठविण्याचा विधी झाला. सडा रांगोळी, पाय पुजनाने धुपारतीचे स्वागत करण्यात आले. दुपारी १ . ३० वाजता परत जोतिबा मंदिरात धुपारतीची सांगता तोफेच्या सलामीने झाली. अंगारा वाटप करून नवरात्र उपवासाची सांगता झाली. यावेळी देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडी, व्यवस्थापक धैर्यशील तिवले, सिंधिया ग्वाल्हेर ट्रस्टचे अजित झूगर, मानाचे दहा गावकर, कोडोली पोलिस स्टेसनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलाश कोडग, ग्रामपंचायत अधिकारी प्रविणकुमार पोवार, पोलिस पाटील बाळासाहेब कदम , नवरात्र उपासक, ग्रामस्थ आणि भाविक सहभागी झाले होते.